Vidhan Sabha 2019 : सावकारी कर्जमाफीचे लाभार्थी आहेत तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 04:49 AM2019-09-17T04:49:19+5:302019-09-17T04:49:45+5:30
युती सरकारने अधिकृत सावकाराच्या कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांच्या कर्जाला माफी दिली असली तरी प्रत्यक्षात शेतक-याला या माफीचा कोणताही फायदा होण्याची चिन्हे नाहीत.
- राजेश निस्ताने
विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन भाजप-सेना युती सरकारने अधिकृत सावकाराच्या कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांच्या कर्जाला माफी दिली असली तरी प्रत्यक्षात शेतक-याला या माफीचा कोणताही फायदा होण्याची चिन्हे नाहीत. कारण सराफ-सुवर्णकाराकडे गहाण ठेवलेले दागिने शेतकऱ्यांनी केव्हाच मोडले आहेत तर काही दागिने सावकाराकडेच (सोडविले न गेल्याने) पचले आहेत. त्यामुळे या कर्जमाफीचे नेमके लाभार्थी कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासनाने ३० नोव्हेंबर २०१४ ही तारीख निश्चित करून या तारखेपूर्वी परवानाप्राप्त सावकाराकडे सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेऊन कर्ज उचललेल्या शेतकºयांना माफी दिली आहे. ज्या सावकारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकºयांना कर्ज दिले, त्यांच्यासाठी ही माफी होती. मात्र सावकाराच्या कार्यक्षेत्राबाहेरील अर्थात जिल्ह्यांतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील शेतकºयांनाही कर्जमाफी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. परंतु गेली पाच वर्ष शासनाने या प्रस्तावावर कोणताच निर्णय घेतला नाही. आता निवडणुका तोंडावर आल्याने गेल्या आठवड्यात कॅबिनेट बैठकीमध्ये सावकाराच्या कार्यक्षेत्राबाहेरील शेतकºयांना माफी देण्याचा निर्णय घेतला गेला. शासनाच्या या निर्णयाचा हजारो शेतकºयांना फायदा होईल असे सरकारचे मंत्री, सत्ताधारी आमदार सांगत असले तरी प्रत्यक्षात या निर्णयाबाबत संभ्रम आहे. कारण शासनाने सावकाराच्या कार्यक्षेत्राबाहेरील कर्जमाफीचा निर्णय लगेच घेतला नाही, शासन ही माफी देणार नाही असे मानून अनेक शेतकºयांनी आपले गहाण दागिने पैशाची तडजोड करुन सोडवून घेतले.
तर काही सावकारांनी कर्जाची रक्कम दागिन्यांच्या किंमतीपेक्षा अधिक झाल्याने ते दागिने मोडित काढले. तर काही शेतकºयांनी स्वत:च हे दागिने मोडले. आजच्या घडीला एखाद दोन टक्के परवानाप्राप्त सावकारांकडे शेतकºयांचे हे दागिने असण्याची शक्यता आहे. मात्र या दागिन्यांची किंमत कर्जापेक्षा कमीच आहे. यात सावकाराचेच शेतकºयांकडे घेणे निघते. कर्जमाफीच्या या प्रकरणात शासन माफी नेमकी कुणाला आणि कशी देणार याबाबत सहकार प्रशासनात संभ्रम आहे. कारण शेतकºयांनी दागिने सोडविले असल्याने एक तर त्याच्या घरपोच ही कर्जमाफी शासनाला द्यावी लागेल. दागिने सावकाराने मोडले असेल तर माफीची रक्कम सावकाराला देऊन त्याने हे दागिने शेतकºयांना परत करणे हा दुसरा मार्ग आहे. त्यातही २०१४ पासून आतापर्यंत सावकाराने दागिने ठेवले असेल तर त्याचे व्याज शासन देणार का असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. एकूणच सावकाराच्या कार्यक्षेत्राबाहेरील या कर्जमाफीचा सरकारलाच राजकीय फायदा अधिक होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात शेतकरी अथवा सावकाराला याचा फारसा फायदा नसल्याचे सांगितले जाते. बॉक्स व्याज दराबाबत संभ्रम सावकारी कर्जावरील व्याजदर नियमानुसार मासिक दीड टक्का अर्थात वार्षिक १५ टक्के एवढा आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकºयाची अडचण ओळखून तीन ते चार टक्के मासिक दराने व्याज आकारले जाते. सराफा बाजारात अनधिकृत सावकारांचीच संख्या अधिक सराफ बाजारात परवानाप्राप्त सावकारांची संख्या अगदीच कमी असली तरी सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवणाºया अनधिकृत सावकारांची संख्या प्रचंड आहे.