Vidhan Sabha 2024: मविआचे सरकार स्थगिती देणारे; देवेंद्र फडणवीसांनी चढवला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 09:31 AM2024-11-17T09:31:06+5:302024-11-17T09:32:27+5:30

महाविकास आघाडीसमोर निवडणुकीसाठी मुद्देच उरले नसून ते समाजाला जाती-जातींमध्ये विभाजित करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

Vidhan Sabha 2024: Mavi's govt suspended; Attack by Devendra Fadnavis | Vidhan Sabha 2024: मविआचे सरकार स्थगिती देणारे; देवेंद्र फडणवीसांनी चढवला हल्ला

Vidhan Sabha 2024: मविआचे सरकार स्थगिती देणारे; देवेंद्र फडणवीसांनी चढवला हल्ला

भद्रावती (चंद्रपूर) : महायुती सरकारने एससी, एसटी, आदिवासी, ओबीसी, भटका-विमुक्त समाज, दलितांसाठी विविध योजना काढल्या. त्यात शिष्यवृत्ती योजना, मोफत शिक्षण योजना, घरकुल योजना, बिरसा मुंडा योजना असे ओबीसी व भटक्या विमुक्तांसाठी एकूण ४८ निर्णय महायुतीच्या सरकारने घेतले. महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून, गती व प्रगतिशील सरकार आहे व महाविकास आघाडीचे सरकार स्थगिती देणारे सरकार आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

येथील नीळकंठराव शिंदे पटांगणावर महायुतीचे उमेदवार करण देवतळे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आ. सुभाष धोटे, आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना सोयाबीनचा सहा हजार रुपये भाव देण्याचा प्रयत्न चालू आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ हजारांवरून २० हजार रुपये बोनस दिला. आता २५ हजार  रुपयांचा बोनस देण्याची तरतूद चालू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ३६५ दिवस १२ तास वीज देणार आहोत. त्यात कृषिपंपासाठी लागणाऱ्या विजेचे बिल द्यावे लागणार नाही. 

गोसीखुर्दचे पाणी आरमोरीला आणणार

गडचिरोली : छत्तीसगड, तेलंगणातून महाराष्ट्रात येताना गडचिरोली हा पहिला जिल्हा लागतो. त्यामुळे महाराष्ट्राचे हे शेवटचे टोक नाही, तर प्रवेशद्वार आहे. या भागातील विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. गोसीखुर्दचे पाणी आरमोरीत आणून सिंचन सुविधा उपलब्ध केल्या जातील, उद्योगांनाही चालना दिली जाईल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

आरमोरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे यांच्या प्रचारार्थ देसाईगंज येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सज्जन आमदारांची विधानसभेत स्पर्धा घेतली तर कृष्णा गजबे हे पहिले येतील, असे सांगून फडणवीस यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करीत कृष्णा गजबेंना आशीर्वाद द्या, विकासाची गॅरंटी मी घेतो, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.

मविआकडून मतांसाठी अल्पसंख्याकांचे लांगूलचालन

नागपूर : महाविकास आघाडीसमोर निवडणुकीसाठी मुद्देच उरले नसून ते समाजाला जाती-जातींमध्ये विभाजित करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा अल्पसंख्यांकांच्या मतांवर डोळा असून त्यासाठी लांगूलचालनाची सर्वोच्च पातळी गाठली आहे.राष्ट्रहितासाठी सर्वांना एकजूट करावी लागेल व ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांना महायुती प्रत्युत्तर देईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, म्हणाले.

उलेमा कौन्सिलचे प्रमुख सज्जाद नोमानी हे व्होट जेहादचे आवाहन करीत आहेत. धर्माचा वापर करून शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेस व्होट जिहाद करीत आहेत. नोमानी यांनी या पक्षांकडे १७ मागण्या दिल्या होत्या. मुस्लिमांना १० टक्के आरक्षण, २०१२ ते २०२४ दरम्यान महाराष्ट्रातील दंगलींमधील मुस्लिम आरोपींच्या केसेस काढून घेणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणे, अशा प्रकारच्या या मागण्या आहेत. देशाच्या इतिहासात निवडणुकीत मते मिळविण्यासाठी इतके लांगूलचालनपणा आम्ही बघितले नव्हते. त्याविषयी तथाकथित सेक्युलर काहीच का बोलत नाहीत, असा सवालही फडणवीस यांनी केला.

Web Title: Vidhan Sabha 2024: Mavi's govt suspended; Attack by Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.