...तोपर्यंत मजा मारा : शिंदे गट; सुप्रीम कोर्टात जाऊ : ठाकरे गट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 06:27 AM2023-02-28T06:27:15+5:302023-02-28T06:29:40+5:30
सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांपर्यंतचा आदेश दिला आहे. एक आठवडा उद्या संपतोय. एक आठवडा राहतोय.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटासह सर्व ५६ आमदारांना व्हिप बजावणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार व्हिप जारी करण्यात आल्याचे सोमवारी गोगावले यांनी स्पष्ट केले. ठाकरे गटाकडून मात्र व्हिप बजावला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचा इशारा देण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांपर्यंतचा आदेश दिला आहे. एक आठवडा उद्या संपतोय. एक आठवडा राहतोय. त्यामुळे दोन आठवडे कोणतीही कारवाई करणार नाही. तोपर्यंत मजा मारा; पण त्यानंतर पक्षादेश पाळावाच लागेल, असे गोगावले यांनी सोमवारी बजावले.
ते म्हणाले, “अधिवेशनाला हजर राहावे, असा व्हिप आमदारांना बजावला आहे. हा कारवाईचा व्हिप नाही. दोन आठवड्यांनंतर कोर्ट जो आदेश देईल, त्यानुसार निर्णय घेऊ. व्हिपचे पालन न केल्यास कारवाई करू. आम्ही गद्दार असतो तर शिवसेना नाव मिळाले नसते.”
व्हिप ही तर ‘कोंबडीहूल’
n ठाकरे गटातही व्हिपबाबत संभ्रम होता. प्रत्येक आमदार एकमेकाला व्हिप आला का, असे विचारत होता.
n ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केल्यास काेर्टात अवमान याचिका दाखल केली जाईल, असा इशारा दिला.
n भास्कर जाधव म्हणाले, “बातम्या पसरवून कोणीही घाबरणार नाही. कोकणात याला कोंबडीहूल म्हणतात. त्याला कोणीही भीक घालत नाही.”