विधानसभा निवडणूक निकाल: कोल्हापूर 'भाजप'मुक्त होण्याच्या मार्गावर ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 12:29 PM2019-10-24T12:29:10+5:302019-10-24T13:18:14+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही जागा अडचणीत
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून विविध जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी कल समोर येत आहेत. कोल्हापूर जिल्हात भाजपला मोठा धक्का बसला असून दोन्ही उमेदवार पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूर दक्षिणमधून अमोल महाडिक मागे असून तर इचलकरंजीतून सुरेश हालवनकर यांना अपक्ष उमेदवार भारी पडत आहे.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अमोल महाडिक यांना ६८ हजार ७४६ मते मिळाली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांना ९८ हजार ६७० मते मिळाली आहे. त्यामुळे महाडिक २९ हजार ९२४ मतांनी पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
त्याचप्रमाणे इचलकरंजीमधुन रिंगणात असलेले भाजपचे उमेदवार सुरेश हालवनकर हे सुद्धा अडचणीत असून अपक्ष उमेदवार प्रकाशअन्ना आव्हाडे यांना १ वाजून ५८ मिनटाच्या आलेल्या आकडेवारीनुसार १ लाख १६ हजार २७९ ते मिळाली आहे. तर हालवनकर यांना ६६ हजार ७७३ मते मिळाली आहे. त्यामुळे हालवनकर हे ४९ हजार ५०६ मतांनी पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही जागा अडचणीत असून, कोल्हापूर जिल्हा 'भाजप'मुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. तर काही तासात कोल्हापूरचे चित्र स्पष्ट होतील.