पाच महिन्यांच्या बाळाला धुळीत कसे ठेवू ? आ. सरोज अहिरे यांनी अश्रूंना करून दिली वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 10:53 AM2023-02-28T10:53:18+5:302023-02-28T10:54:06+5:30
अडीच महिन्यांपूर्वी नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात अडीच महिने वयाच्या त्यांच्या बाळासाठी (प्रशंसक) हिरकणी कक्ष उभारलेला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पाच महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन देवळाली (नाशिक)च्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे सोमवारी विधानभवनात आल्या. त्यांच्या बाळासाठी हिरकणी कक्ष तर राखीव ठेवला होता, पण त्यात कोणतीही सुविधा तर नव्हतीच शिवाय धूळ, अस्वच्छता असल्याने अहिरे कमालीच्या अस्वस्थ झाल्या. माध्यमांशी बोलताना त्यांनी अश्रूंना वाट करून दिली. शेवटी यंत्रणा हलली आणि सायंकाळी हिरकणी कक्ष व्यवस्थित करण्यात आला.
अडीच महिन्यांपूर्वी नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात अडीच महिने वयाच्या त्यांच्या बाळासाठी (प्रशंसक) हिरकणी कक्ष उभारलेला होता. यावेळी मुंबईच्या अधिवेशनातही तसाच कक्ष असावा, असे पत्र त्यांनी चार दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यानुसार कक्षाची व्यवस्था केली गेली पण सासू आणि बाळासह सरोज अहिरे त्या कक्षात गेल्या आणि तेथील दुरवस्था बघून त्या व्यथित झाल्या.
कक्षाची अशीच दुरवस्था राहणार असेल, तर मला नाशिकला परत जावे लागेल. माझे बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे मी त्याला घेऊन आले. आजीच्या हाती त्याला देऊन सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याचे मी पक्के केले होते, पण कक्षात प्यायला पाणी नाही, स्वच्छतागृह नाही, धूळ साचलेली आहे. माझ्या बाळाला आज ताप आहे, अशा परिस्थितीत या घाणीत त्याला कसे ठेवणार, अशी विचारणा त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.