विदर्भात शिवसेनेचा तह कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2017 01:25 AM2017-02-05T01:25:16+5:302017-02-05T01:25:16+5:30
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भाजपा आणि शिवसेना आमनेसामने असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे
- यदु जोशी, मुंबई
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भाजपा आणि शिवसेना आमनेसामने असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे बडे नेते नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडात म्हणजे नागपूर व विदर्भात प्रचारसभा घेण्याचे टाळल्याने त्याची उलटसुलट चर्चा आहे.
शिवसेनेच्या मुखपत्रात उद्धव ठाकरे यांच्या जाहीरसभांची ठिकाणे आणि तारखा शनिवारी जाहीर करण्यात आल्या. त्यानुनसार मुंबईप्रमाणेच नाशिक, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडला त्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. मात्र, १९ तारखेपर्यंतच्या कार्यक्रमात विदर्भातील एकाही सभेचा उल्लेख नाही. अलिकडील काही वर्षांत भाजपाचा बालेकिल्ला म्हणून समोर आलेल्या विदर्भात ठाकरे यांनी प्रचारासाठी जाण्याचे टाळले असे तूर्त तरी त्यातून दिसते.
विदर्भात नागपूर, अमरावती आणि अकोला महापालिका तसेच चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती आणि बुलडाणा जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. विधानसभा निवडणुकीत ६२ पैकी ४४ जागा आणि अलिकडे झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाने दमदार यश मिळविले होते.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील आपापल्या पहिल्याच मेळाव्यात एकमेकांना लक्ष्य केले होते. उद्धव हे नागपुरात किंवा विदर्भात जाऊन गडकरी-फडणवीस यांच्याविषयी काय बोलतात, याबाबत उत्सुकता होती. तथापि, सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे त्यांची सभा होणार नसल्याचे स्पष्ट झाले. नागपुरात निदान शिवसेनेचे बडे नेते प्रचाराला उतरतील, असा होरा होता पण खा. भावना गवळी, राज्यमंत्री संजय राठोड, आ. तानाजी सावंत यांच्याच केवळ सभा होणार आहेत. गडकरी-फडणवीसांच्या तोफांसमोर त्यांचा आवाज कितपत ऐकू येईल, हा प्रश्नच आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक हा शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा विषय आहे. एकट्या मुंबईत उद्धव यांच्या २० प्रचारसभा होणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे गडकरी यांच्याशी अत्यंत जिव्हाळ््याचे संबंध होते. तथापि, उद्धव यांच्याशी त्यांचे ते सख्य नाही. चिमूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत युतीमध्ये कोण लढावे या विषयावरून त्यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली आणि नंतर ते फार जवळ कधीही येऊ शकले नाहीत.
मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव यांचे संबंध मात्र अतिशय जिव्हाळ््याचे राहिले आहेत. या सबंधांमुळेच मुंबईत युतीवर शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास शेवटपर्यंत व्यक्त केला जात होता. तथापि, युती होऊ शकली नाही.
नागपुरचे सेनेचे माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांनी लोकमतला सांगितले की, आमचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी उद्धवजींची एक तरी सभा आपण मिळवूच असा विश्वास आम्हाला दिला आहे.
आम्ही उद्धवजी तसेच, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, अमोल कोल्हे यांच्या सभा पक्षाकडे मागितल्या आहेत. अद्याप तारखा मिळालेल्या नाहीत.
गडकरींच्या मुंबईत सभा
मुंबईत भाजपाचे मुख्य प्रचारक अर्थातच मुख्यमंत्री फडणवीस हे असतील. त्यांच्या नेतृत्वातील सरकारच मुंबईचा सर्वांगीण विकास करू शकते, हा विश्वास भाजपा मतदारांना देणार आहे. सोबतच आपल्या सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाच्या काळात ५५ उड्डाणपुल बांधणारे नितीन गडकरी यांच्याही मुंबईत सभा होणार आहेत.
भारत गणेशपुरे प्रचारात!
टीव्हीवरील लोकप्रिय कलाकार, चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे एका वेगळ्या कारणामुळे शिवसेनेच्या प्रचारात उतरू शकतात. त्यांच्या सख्ख्या वहिनी मनीषा गणेशपुरे या अमरावती महापालिकेत शिवसेनेच्या उमेदवार आहेत. मनीषा यांच्यासाठी स्वत: भारत आणि अन्य काही कलावंत प्रचार करणार असल्याचे अमरावती शहर प्रमुख सुनील खराटे यांनी सांगितले.