फेब्रुवारीत अमळनेरमध्ये विद्रोही साहित्य संमेलन, कवी संपत सरल यांच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 09:29 AM2024-01-15T09:29:29+5:302024-01-15T09:30:34+5:30
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रतिमा परदेशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
मुंबई : अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारीला होणाऱ्या १८व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन राजस्थान येथील प्रसिद्ध कवी संपत सरल यांच्या हस्ते होणार आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रतिमा परदेशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्याम पाटील, मुख्य संयोजक डॉ.लिलाधर पाटील, मुख्य समन्वयक प्रा.अशोक पवार, निमंत्रक रणजीत शिंदे, उपाध्यक्ष अर्जुन बागुल, कोकण विभागप्रमुख सुदीप कांबळे उपस्थित होते. संपत सिंह शेखावत उर्फ संपत सरल हे लोकशाहीवर निष्ठा असणारे कवी आहेत.
१० हजारांची उपस्थिती
आपल्या कवी आणि व्यंगात्मक रचनेसाठी संपत सरल जगभर ओळखले जातात. राजकीय समस्या आणि मुद्द्यांवर ते समाजमाध्यमांवर विडंबन करतात. राजकीय घडामोडींवर ते परखड भाष्य करतात. ‘चाकी देख चुनाव की’ आणि ‘छद्मभूषण’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. असे संपत सरल विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत, अशी माहिती प्रतिमा परदेशी यांनी दिली.
यंदा संमेलनाचे हे १८वे वर्ष आहे. साहित्य संमेलनाला ८ ते १० हजार कार्यकर्ते येणार आहेत, असेही परदेशी यांनी सांगितले. महात्मा फुले यांच्या भूमिकेनुसार विद्रोही साहित्य संमेलन घेतो, असे परदेशी यांनी सांगितले.