'समाजमनाशी एकरूप विदुषी', मुख्यमंत्र्यांकडून डॉ. गेल ऑम्व्हेट यांना श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 12:06 PM2021-08-25T12:06:24+5:302021-08-25T12:29:05+5:30
Researcher, author Gail Omvedt passes away : डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे बुधवारी वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका डॉ. गेल ऑम्व्हेट तथा शलाका भारत पाटणकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
"भारतातील सामाजिक चळवळी, लोकपरंपरा, संतसाहित्य अशा विविधांगी क्षेत्रात डॉ. गेल ऑम्व्हेट यांनी संशोधक, अभ्यासक म्हणून तसेच स्त्रिया, वंचिताच्या न्याय हक्कांसाठी सक्रीय असे योगदान दिले आहे. समाजमनाशी एकरूप विदुषी म्हणून त्यांच्या या योगदानाची नोंद राहील. डॉ. गेल ऑम्व्हेट यांना भावपूर्ण श्रद्धांजली", असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
जेष्ठ संशोधक -लेखिका, स्त्री मुक्ती चळवळ आणि परित्यक्ता स्त्रियांची चळवळ, आदिवासी चळवळीमध्ये पायाला भिंगरी लावून झपाटल्या सारखे काम करणाऱ्या विचारवंत कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे बुधवारी वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी (दि.२६) सकाळी १० वा. कासेगाव (जि. सांगली) येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. गेल ऑम्व्हेट मूळच्या जन्माने अमेरिकेच्या असल्या तरी त्या तेथे विध्यार्थीदशेपासूनच वेगवेगळ्या चळवळीमध्ये सक्रिय होत्या. अमेरिकेच्या साम्राज्यवादी युद्धखोर प्रवृत्तीविरोधी उभा राहिलेल्या तरुणाईच्या चळवळीत त्या अग्रस्थानी होत्या. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या भारतात आल्या, वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रात आल्या आणि महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षाला आपलेसे केले, पुढे महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी वसाहतीक समाजातील सांस्कृतिक बंड (नॉन ब्राह्णिण मूहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया ) हा आपला पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बरकली विद्यापीठात सादर करून त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली.
डॉ. गेल ऑम्व्हेट यांनी देशभरातील विविध विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे विद्यापीठात फुले- आंबेडकर अध्यासन प्रमुख, समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक, ओरिसामधील निस्वासमध्ये आंबेडकर चेअरच्या प्रोफेसर, नोर्डीक येथे आशियाई अतिथी प्राध्यापक, इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज कोपनहेगन, नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररी नवी दिल्ली, सिमला इन्स्टिट्यूट मध्ये प्रोफेसर म्हणून काम केले आहे.
डॉ. गेल ऑम्व्हेट यांची पंचवीसपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित असून त्यामध्ये प्रामुख्याने कल्चरल रीवोल्ट इन कोलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हीण मुहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्ह्यूलेशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, न्यू सोशल मुमेन्ट इन इंडिया यांचा समावेश आहे.