विद्यार्थी भारती विरुद्ध अभाविप
By admin | Published: March 4, 2017 01:49 AM2017-03-04T01:49:10+5:302017-03-04T01:49:10+5:30
डाव्या संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील (अभाविप) संघर्ष आता अधिकच गडद होत चालला आहे
मुंबई : डाव्या संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील (अभाविप) संघर्ष आता अधिकच गडद होत चालला आहे. मुंबई विद्यापीठात शुक्रवारी विद्यार्थी भारतीने अभाविपविरुद्ध मूक आंदोलन केले. अभाविपची देशातील प्रत्येक विद्यापीठात सुरू असलेली गुंडगिरी रोखण्यासाठी विद्यार्थी भारतीने आंदोलन केल्याचे स्पष्ट केले.
दिल्ली विद्यापीठात डाव्या संघटना आणि अभाविपमध्ये सुरू झालेल्या वादाचे पडसाद मुंबईतही उमटायला लागले आहेत. मुंबईतील डाव्या संघटना अभाविपचा विरोध करण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये शुक्रवारी मूक निदर्शने करण्यात आली.
रोहित वेमुला प्रकरण, सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांना केलेली मारहाण आणि आता गुरमेहर कौरला बलात्काराची दिलेली धमकी या गुंडागिरीला लगाम लावावाच लागेल, असे विद्यार्थी भारती विद्यापीठ अध्यक्षा ज्योती निकाळजे यांनी सांगितले.
विद्यार्थी भारती संघटनेतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनात अभाविपवर बंदी आणलीच पाहिजे, गुरमेहर कौरला धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा, या मागण्या करण्यात आल्या. (प्रतिनिधी)