विद्यापीठाचा सावध पवित्रा
By admin | Published: August 8, 2014 01:09 AM2014-08-08T01:09:18+5:302014-08-08T01:09:18+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘एलएलबी’ अभ्यासक्रमातील निकालातील ‘मॅजिक’बद्दल विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी विद्यार्थी विद्यापीठात धडकले होते.
‘एलएलबी’तील ‘मॅजिक’: विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘एलएलबी’ अभ्यासक्रमातील निकालातील ‘मॅजिक’बद्दल विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी विद्यार्थी विद्यापीठात धडकले होते. परंतु यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना साधे चौकशीचे आश्वासनही दिले नाही. पहिले जुन्या व सुधारित दोन्ही गुणपत्रिका घेऊन या, मग पाहू, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तीन वर्षीय ‘एलएलबी’च्या चौथ्या सेमिस्टरच्या (सीबीएस) निकालात एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चक्क दोन विषयांत सारखे गुण देण्यात आले होते. परंतु त्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या सुधारित निकालांत अनेकविद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण घोषित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये प्रचंड तफावत आढळून आली असून, ही बाब थोड्याथोडक्या नव्हे तर अनेक विद्यार्थ्यांसोबत झाली आहे. अगदी ‘टॉपर्स’मध्ये असलेले विद्यार्थी अ़नुत्तीर्ण झाले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
गुरुवारी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत परिसरात निरनिराळ्या महाविद्यालयांतील विद्यार्थी एकत्रित आले होते. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांची भेट घेतली. प्र-कुलगुरूंनी विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतली; परंतु कोणत्याही चौकशीचे आश्वासन दिले नाही. सोबतच विद्यार्थ्यांनी जुन्या तसेच सुधारित निकालाची प्रत द्यावी, असेदेखील म्हटले. केवळ निवडक विद्यार्थ्यांकडेच प्रत उपलब्ध असल्यामुळे त्यांना शुक्रवारी बोलाविण्यात आले आहे. परीक्षा विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व घोळ सुरुवातीच्या चुकीमुळे झाला. दोन विषयांत सारखे गुण देण्यात आले होते. सुधारित निकालांत ही चूक सुधारण्यात आली.
त्यात विद्यार्थ्यांना जे गुण मिळाले होते ते गुणपत्रिकेत नमूद आहेत, अशी बाजू मांडण्यात आली आहे. यासंदर्भात परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)