पोटनिवडणुकीत मोठमोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून मिळवला विजय, आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 12:16 PM2017-10-12T12:16:37+5:302017-10-12T12:28:19+5:30
मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप येथील प्रभाग क्रमांक 116 च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार विजयी झाल्यानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप येथील प्रभाग क्रमांक 116 च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार जागृती पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. "भांडुपमधील पोटनिवडणुकीत मोठ मोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून भाजपाने विजय मिळवला," असे ट्विट करत शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. काढला आहे.
पोटनिवडणूकीत मोठे दावे करणार्यांचे पोटफाडून भाजपाचा विजय... कार्यकर्त्तांचे अभिनंदन!!
— ashish shelar (@ShelarAshish) October 12, 2017
केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपावर शिवसेना नेतृत्वाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भांडुपमधील पोटनिवडणूक शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली होती. दरम्यान, या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार विजयी झाल्यानंतर शिवसेनेवर पलटवार करण्याची संधी भाजपाच्या मुंबईतील नेतृत्वाने सोडली नाही. " या पोटनिवडणुकीत मोठमोठे दावे करणाऱ्या विरोधकांचे पोट फाडून भाजपाने विजय मिळवला आहे. या विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा विश्वास कायम असल्याचे सिद्ध झाले आहे. हा विजय विकासाचाच आहे. आता सांगा कोण वेडे ठरले?, असा चिमटा शेलार यांनी ट्विटरवरून काढला."
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा विश्वास! हा विजय विकासाचाच! सांगा आता वेडे कोण ठरले?
— ashish shelar (@ShelarAshish) October 12, 2017
आज राज्यातील विविध ठिकाणच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. मुंबईत भांडुपमधल्या प्रभाग क्रमांक 116 च्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सगळयांचे लक्ष लागले होते. इथून भाजपाच्या उमेदवार जागृती पाटील यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी 5 हजार मतांनी विजय मिळवला. भाजपा उमेदवार जागृती पाटील यांना एकूण 11229 मते मिळाली तर, शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांना 6337 मते मिळाली.
पोटनिवडणूकीतही भाजपलाच मुंबईकरांची साथ! भांडूपमधे भाजपा उमेदवार जागृती पाटील यांचा विजय... मुंबईकरांचे, भांडुपकरांचे आभार!!
— ashish shelar (@ShelarAshish) October 12, 2017
काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. भाजपाने ही जागा मिळविण्यासाठी प्रमिला पाटील यांची सून जागृती पाटील यांना उमेदवारी दिली, तर शिवसेनेची मदार विद्यमान आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांच्यावर होती. त्यामुळे दोन पाटलांमध्येच या प्रभागात रस्सीखेच सुरू झाली. विशेष म्हणजे, ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी उभय पक्षांचे बडे नेतेच प्रभागात तळ ठोकून होते.
यासाठी महापालिकेतील सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. या पोटनिवडणुकीत एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, खरी लढत शिवसेना व भाजपामध्येच दिसून आली. आपल्या जास्तीतजास्त मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांची दिवसभर धावपळ सुरू होती, परंतु मतदारांमध्ये महिला मतदार आघाडीवर होत्या. संध्याकाळी साडेपाचपर्यंत ५०.६४ टक्के मतदान झाले.