विधानसभा उपाध्यक्षपदी विजय औटींची बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 12:09 PM2018-11-30T12:09:35+5:302018-11-30T12:45:06+5:30
विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मुंबई : गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सध्या विधानसभेचे अध्यक्षपद हे भाजपाच्या कोट्यातून हरिभाऊ बागडे यांच्याकडे आहे. तर, गेल्या चार वर्षांपासून विधानसभेचे उपाध्यक्षपद रिक्त होते. भाजपा-शिवसेना सरकारचा अवघा एक वर्षाचा कार्यकाळ उरला असताना 28 नोव्हेंबरला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या निवडणुकीसाठीची नामनिर्देशनपत्रे 29 नोव्हेंबरला सकाळी 11.45 वाजेपर्यंत विधानमंडळाचे प्रधान सचिव यांच्या दालनात सादर करायची होती. यात शिवसेनेचे विजय औटी, काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते.
मुंबई : विधानसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या विजय औटी यांची बिनविरोध निवड, विधानसभा अध्यक्षांची घोषणा
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) November 30, 2018
या निवडणुकीत विधानसभेत भाजपा- शिवसेनेचे बहुमत असल्याने शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड निश्चित मानली जात होती. मात्र, आज विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माघार घेतली. त्यामुळे विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली आहे.