विजय दर्डा यांनी दिल्या धोनी व सुशांत सिंग यांना शुभेच्छा
By admin | Published: October 4, 2016 02:26 AM2016-10-04T02:26:06+5:302016-10-04T02:26:06+5:30
क्रिकेटच्या मैदानावर संघाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेत असताना अनेक विक्रम नोंदविणाऱ्या एमएस धोनी याच्या जीवनावर आधारित एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी
क्रिकेटच्या मैदानावर संघाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेत असताना अनेक विक्रम नोंदविणाऱ्या एमएस धोनी याच्या जीवनावर आधारित एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी हा सिनेमा पडद्यावरही विक्रम करेल, अशा शुभेच्छा लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला दिल्या.
मुंबई येथील हॉटेल ताज लँड एंड येथे ही भेट घडून आली. यावेळी पूर्णा प्रफुल पटेल याही धोनीला भेटल्या. ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट असून, माझ्या रिअल लाईफमधील संघर्ष रिल लाईफमध्ये अतिशय सुरेखपद्धतीने मांडला आहे असे सांगत हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरेल, अशा शुभेच्छाही यावेळी धोनीने दिल्या. चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत धोनीने समाधान व्यक्त केले असून, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वत: नॉर्थइस्टला जाणार असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकारांबरोबर स्वत: महेंद्रसिंग धोनी उपस्थित राहत असल्याने चित्रपटाविषयीची लोकांमध्ये उत्सुकता वाढत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 21.30 कोटींची रेकॉर्डब्रेक ओपनिंग केल्याने हा चित्रपट 150 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवेल असा विश्वासही धोनीने व्यक्त केला.
सुशांत सिंग राजपूतची लोकमतला भेट
एम एस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची भूमिका साकारणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने नुकतीच लोकमत कार्यालयाला भेट दिली. यावेळी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी सुशांत सिंग राजपूत याला त्याच्या या आगामी बायोपिकसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गुडवीन ज्वेलर्सचे संचालक सुनील कुमार व सुधीश कुमार आणि लोकमतचे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला उपस्थित होते. क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला. 2011 मध्ये विश्वचषकावर भारताचे नाव कोरणारा भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेन्द्रसिंग धोनी याच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून या चित्रपटात सुशांत सिंग याने साकारलेल्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.