देव घडवणारा माणूस गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 04:21 AM2017-07-27T04:21:06+5:302017-07-27T04:21:14+5:30
‘मुंबईचा राजा’सह महाराष्ट्रातील अनेक गणेशमूर्ती साकारणारे प्रसिद्ध गणेश मूर्तिकार विजय खातू यांचे बुधवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दादर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबई : ‘मुंबईचा राजा’सह महाराष्ट्रातील अनेक गणेशमूर्ती साकारणारे प्रसिद्ध गणेश मूर्तिकार विजय खातू यांचे बुधवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दादर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गणेशोत्सव महिन्याभरावर असताना,
खातू यांच्या निधनाचे वृत्त आल्याने देव घडवणारा माणूस गेला अशीच भावना व्यक्त केली जात आहे.
विजय खातू यांना छातीत दुखू लागल्याने, तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. गेली जवळपास ४६ वर्षे खातू गणेशमूर्ती घडविण्याच्या व्यवसायात आहेत. त्यांनी गणपतीच्या २५ फुटांपर्यंत उंचीच्या सुमारे २५० मूर्ती घडविल्या. खातू यांचे मूर्तिकला क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन, राज्य सरकारने त्यांना ‘उत्कृष्ट मूर्तिकार’ या पुरस्काराने सन्मानित केले होते. गणेश मूर्तीच्या चेहºयावरील भाव आणि डोळ््यांमधील जिवंतपणा यासाठी खातू प्रसिद्ध होते.
मुंबईतील गणेशोत्सवाला वेगळ्या उंचीवर नेण्यात खातू यांच्या मूर्तिकलेचे योगदान आहे. लालबागचा राजा, गणेशगल्लीचा गणपती, खेतवाडी, चंदनवाडी, चिराबाझार, चिंचपोकळीचा चिंतामणी आदी मंडळाच्या मूर्ती खातू घडवित असत.
खातू यांच्या परळ येथील रेल्वेच्या कारखान्यात ८०० हून अधिक गणेश मंडळांच्या मूर्ती घडविल्या जातात. बंधू राजन खातू यांच्या सहकार्याने राज्याच्या कानाकोपºयातील गणेशमूर्तीही ते घडवित असत. विजय खातू यांचे वडील रामकृष्ण खातू पोद्दार कापड गिरणीत सुमारे ३० वर्षे नोकरीला होते. स्वत: विजय खातू यांनीही स्वदेशी कापड गिरणीत ती बंद होईपर्यंत ६ वर्षे काम काम केले. वडील रामकृष्ण खातू यांच्याकडून विजय खातू यांनी मूर्तिकलेचे धडे गिरविले.
.........................
गणेशोत्सवाची चाहूल लागलेली असतानाच, खातूंची अशी अचानक झालेली ‘एक्झिट’ अत्यंत हृदयद्रावक आहे. प्रत्येक गणेशोत्सवाच्या वेळी रात्रीचा दिवस करून, स्वत:ला झोकून देत गणेशमूर्तींना घडविण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे योगदान कायम सर्वांच्याच स्मरणात राहील.
- अॅड. नरेश दहीबावंकर, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, अध्यक्ष
......................
माणूस म्हणूनही ते तितकेच श्रेष्ठ होते. शिल्पकला क्षेत्रातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडविले.
- गजानन तोंडवळकर, ज्येष्ठ मूर्तिकार
मूर्तिकला क्षेत्राचे नुकसान
विजय खातू यांनी घडविलेल्या मूर्ती आकर्षक आणि गणेशभक्तांना देहभान हरपून ‘बाप्पा’च्या रूपात एकरूप करणाºया होत्या. ‘लालबागचा राजा’ही १९९७ आणि १९९८ या सलग दोन वर्षी खातू यांनी साकारला होता.