प्रसिद्ध गणेश मूर्तीकार विजय खातू यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 12:38 PM2017-07-26T12:38:28+5:302017-07-26T18:33:39+5:30
मुंबई, दि. 26 - प्रसिद्ध गणेश मूर्तीकार विजय खातू यांचे आज सकाळी निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. आज राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्यदिव्य आणि आकर्षक गणेशमूर्ती साकारण्यामध्ये त्यांच्या हातखंडा होता. मोठ्या गणेशमूर्ती हे त्यांच्या चित्रशाळेचे वैशिष्ट होते. मुंबईत मोठ्या गणेशमूर्ती साकारण्याची परंपरा सुरू करणारे प्रसिद्ध मूर्तीकार दीनानाथ वेलिंग यांच्यानंतर ही परंपरा खातू यांनी सक्षमपणे पुढे चालवली. गणेशमूर्तीमधील हावभाव आणि डोळ्यांची आकर्षक आखणी ही त्यांच्या मूर्तीकलेचे वैशिष्ट्य होते.
खातू यांच्या गणेश चित्रशाळेत मुंबईतील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आकार घेतात. प्रसिद्घ लालबागच्या राजाची गणेशमूर्तीही खातू यांनी काही वर्षे घडवली होती. तसेच लालबाग चिंचपोकळी परिसरातील गणेशगल्ली तसेच चिंतामणी येथील गणेशमूर्तीही त्यांनी घडवल्या आहे.
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी विजय खातू यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे.