विजय मल्ल्यांच्या मुंबईतील किंगफिशर हाऊसच्या लिलावाला शून्य प्रतिसाद
By admin | Published: March 17, 2016 11:10 AM2016-03-17T11:10:26+5:302016-03-17T14:46:53+5:30
कर्ज वसुलीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आज विजय मल्ल्यांच्या मुंबईतील मालमत्तापैकी अंधेरीतील किंगफिशर हाऊसचा ऑनलाइन लिलाव करणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर हाऊसच्या लिलावाला प्रतिसाद मिळाला नसून खरेदीदारांच्या अभावी किंगफिशर हाऊस विकले गेलेले नाही. कर्ज वसुलीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आज 11.30 ते 12.30 या वेळात ई-लिलाव ठेवला होता. यामध्ये विजय मल्ल्यांच्या मुंबईतील मालमत्तांपैकी अंधेरीतील किंगफिशर हाऊस ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध होते. या मालमत्तेची आधारभूत किंमत १५० कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे दीडशेकोटी रुपयांपासून बोलीला सुरुवात होणे अपेक्षित होते, परंतु एकानेही त्यापेक्षा जास्त रकमेची बोली न लावल्याने आजचा दिवस फुकट गेला आहे.
किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेने हजारो कोटींचे कर्ज दिले होते. २०१३ पासून किंगफिशर एअरलाईन्सचे संचालन बंद असून, कंपनीवर ६ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचे कर्ज आहे.
स्टेट बँक आणि युनायटेड बँकेने मल्ल्या यांना थकबाकीदार म्हणून घोषित केले आहे. मल्ल्यांना परदेशात जाण्यापासून रोखावे यासाठी कर्ज देणा-या बँकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र त्यापूर्वीच २ मार्चला मल्ल्या परदेशात निघून गेले.
आता, लिलावाच्या संदर्भात पुन्हा वेगळी तारीख जाहीर होणे अपेक्षित आहे. कदाचित त्यावेळी आधारभूत किंमत कमी करण्यात येईल.