विजय संचेती ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:52 IST2019-05-21T05:52:37+5:302019-05-21T05:52:46+5:30
२५ वर्षांपासून निरंतर ‘मासक्षमण’ तपस्या : ८०० किलोमीटरची ही यात्रा केली पायी

विजय संचेती ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने सन्मानित
रायपूर : नियम-संयमाचे पालन करीत गेल्या २५ वर्षांपासून निरंतर ‘मासक्षमण’ तपस्या करणारे तपस्वी विजय संचेती यांना अलिकडेच कैवल्यधाम तीर्थमध्ये साधू-साध्वींच्या सान्निध्यात ‘गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने सन्मानित करण्यात आले.
संचेतींनी आपल्या विशेष तपस्येच्या मालिकेत तीनवेळा उपधान तप केले आहे. श्री शत्रुंजय सिद्ध गिरिराज तीर्थ पालितानाची दोनवेळा नव्वाणु यात्रा केलेली आहे. त्यांनी ही यात्रा एकासना (दिवसभरात फक्त एकदा सात्विक आहार) आणि चौविहार छटसह पूर्ण केली. याशिवाय त्यांनी रायपूरहून श्री सम्मेद शिखरजी तीर्थ, मधुबनची पायी यात्रा केली. ८०० किलोमीटरची ही यात्रा त्यांनी ५० दिवसांत एकासना-आयंबिल-उपवासाने पूर्ण केली.
त्यांनी नवपदजीची ओली साडेचार वर्षांत पूर्ण केली. संचेती यांनी साधू-साध्वी यांच्या एक हजार किलोमीटरपर्यंतच्या दीर्घ विहारात त्यांच्यासोबत वास्तव केले आहे.
आचार्य जिन पीयूष सागर सुरीश्वर म.सा., सम्यकरत्न सागर म.सा., महेन्द्र सागर म.सा.,साध्वी शुभंकराश्रीजी म.सा., राजेश श्रीजी म.सा., विधुत प्रभाजी म.सा. आदी ठाणाच्या सान्निध्यात अक्षयतृतीया तप पारणा महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात जवळपास ८० तपस्वींना सन्मानित केले गेले. सम्यकसागर म.सा. यांनी तपस्वींची प्रशंसा केली. श्री कैवल्यधाम
तीर्थचे पदाधिकारी सुपारस गोलछा, धरमचंद लुणिया, त्रिलोक बरडिया यांनी तपस्वी विजय संचेती यांचा हार, पगडी देऊन सन्मान केला. यावेळी ‘गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’च्या प्रतिनिधी सोनल शर्मा, राजेश शर्मा, अशोक पटवा, संजय, पूरब श्रेयांश, प्रणय, प्रशांत संचेती, किरण,
रिता, अर्पणा संचेती, सुरेश बुरडसह श्री ऋषभ देव जैन मंदिर आणि दादावाडीचे विश्वस्त उपस्थित होते.
‘मासक्षमण’ म्हणजे काय?
जैन समाजात चातुर्मासदरम्यान ‘मासक्षमण’ची तपस्या अर्थात पूर्ण महिनाभर गरम पाण्याच्या आधारावर उपवास करण्याची परंपरा आहे. त्याच परंपरेचे पालन करताना गेल्या २५ वर्षांपासून संचेती ‘मासक्षमण’ तपस्या करीत आहेत.
‘जैन तत्त्वज्ञानानुसर संयम धर्माच्या पालनाने मनुष्य आपल्या स्वच्छंद प्रवृत्तीला लगाम घालू शकतो. कारण आयुष्यभर आम्ही भलेही कोणत्याही वस्तूचा उपयोग किंवा उपभोग करणार नाही. परंतु, मनात नेहमी त्या वस्तूंबद्दल ओढ असणेही बंधनाचे कारण आहे आणि स्वत:ला नियम धर्माने परिसीमित करून आम्ही या बंधनातून मुक्ती मिळवू शकतो,’ असे विजय संचेती यांनी सांगितले.