विजय शेवले यांना केशवसृष्टी पुरस्कार
By Admin | Published: October 8, 2016 03:18 AM2016-10-08T03:18:49+5:302016-10-08T03:18:49+5:30
केशवसृष्टीने यंदाचा पुरस्कार पुण्यातील विजय शिवले यांना जाहीर केल्याची माहिती पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा वैजयंती आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाईंदर : सामाजिक व राष्ट्रीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करणाऱ्या केशवसृष्टीने यंदाचा पुरस्कार पुण्यातील विजय शिवले यांना जाहीर केल्याची माहिती पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा वैजयंती आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ९ आॅक्टोबरला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
केशवसृष्टीद्वारे सात वर्षापासून विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आठ जणांना आतापर्यंत गौरविण्यात आले आहे. दरवर्षी ज्येष्ठ व्यक्तीला देण्यात येणारा पुरस्कार, यंदा ३५ ते ४० वयोगटातील युवकाची निवड करण्याचा निर्णय समितीने घेतला होता. यामागे त्यांना पुढील अनेक वर्षे समाजकार्याला योगदान देता यावे, हा उद्देश होता. पुरस्कारासाठी यंदा किमान पाच वर्षापासूनच्या सामाजिक कार्याचा आढावा निवड समितीने घेतला.
यंदाच्या पुरस्कारासाठी पुणे येथील येरवडा परिसरात शिक्षण, संस्कार केंद्र, अभ्यासिका व स्वयंरोजगार प्रशिक्षण माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वैचारिक व मानसिक बदल घडविण्यासाठी कार्य करणारे शिवले यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार निवड समितीत आपटे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अलका मांडके, डॉ. शुभा राऊळ, प्राचार्या कविता रेगे, किमया शेलार, अमेया जाधव, उद्योजिका हेमा भाटवडेकर यांचा समावेश होता. या वेळी पुरस्कार संयोजिका रश्मी भातखळकर, केशवसृष्टीचे व्यवस्थापक जगदीश पाटील, अधिकारी अझहर उपस्थित होते.