विजय वडेट्टीवार सक्षम विरोधी पक्षनेते, जनतेच्या प्रश्नांना न्याय देतील - नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 05:53 PM2023-08-03T17:53:08+5:302023-08-03T17:55:07+5:30

आता सक्षम विरोधी पक्षनेता आल्याने सरकारला खोटे उत्तर देता येणार नाही. वडेट्टीवार सरकारला जाब विचारतील असे पटोले यांनी स्पष्ट करत काँग्रेस पक्षाच्यावतीने वडेट्टीवार यांनी शुभेच्छा दिल्या.

Vijay Vadettiwar Competent Leader of Opposition, Will Do Justice to People's Questions - Nana Patole | विजय वडेट्टीवार सक्षम विरोधी पक्षनेते, जनतेच्या प्रश्नांना न्याय देतील - नाना पटोले

विजय वडेट्टीवार सक्षम विरोधी पक्षनेते, जनतेच्या प्रश्नांना न्याय देतील - नाना पटोले

googlenewsNext

मुंबई : राज्यातील शेतकरी, कामगार, तरुणवर्ग, महिला तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम विरोधी पक्ष नेत्याचे आहे. महागाई, बेरोजगारी यासह अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, या प्रश्नांवर सरकारला जाब विचारून जनतेला न्याय देण्याची गरज आहे. विजय वडेट्टीवार हे सक्षम विरोधी पक्षनेते असून आपली भूमिका समर्थपणे पार पाडतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेत्याच्या अभिनंदन प्रस्तावावर नाना पटोले म्हणाले की, सरकार व विरोधी पक्ष ही लोकशाहीची दोन चाके आहे, राज्यातील लोकांना न्याय देण्याचे काम आपण या सभागृहाच्या माध्यमातून करत असतो. राज्याला अभ्यासू व सक्षम विरोधी पक्षनेत्याची परंपरा लाभलेली आहे. नारायण राणे हे सुद्धा एक सक्षम विरोधी पक्ष नेते होते. देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र या सभागृहात आलो त्यावेळी विरोधी पक्षनेते नारायण राणे होते, त्यांचा सभागृहात दरारा होता. वडेट्टीवार हे सुद्धा सक्षम विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडतील अशा शुभेच्छा पटोले यांनी दिल्या.

काँग्रेसला विरोधी पक्ष नेत्याचे नाव देण्यास वेळ लागला असा आरोप करण्यात येत आहे पण अजित पवार यांनी अचानक भूमिका बदलल्यामुळे तो वेळ लागला. खरे म्हणजे २०१९ पासून राज्यात राजकीय विक्रम झाले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व अजित पवार उपमुख्यमंत्री असे सरकार झाले, ते सरकार काही तासातच बदलले व नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असे सरकार आले, असे पटोले म्हणाले.

विधिमंडळाचा इतिहासात नोंद करु नये असा हा काळ आहे. परंतु अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार आहेत कुठे, त्यांच्याबरोबर नक्की किती आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसची नक्की संख्या किती हे सभागृहात सांगावे लागणार आहे. जनतेच्या मनात संशय आहे तो दूर केला पाहिजे त्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी त्यावर निर्णय दिला पाहिजे. या सर्व गोंधळामुळे काँग्रेसला विरोधी पक्ष नेत्याचे नाव देण्यास वेळ झाला असेही पटोले म्हणाले.

राज्यात पेपरफुटीची प्रकरणे उघड झाली आहेत. माझ्याकडे एफआयआरच्या कॉपी आहेत. पण पेपरला आलेल्या बातम्या खोट्या आहेत त्यावर हक्कभंग लावू असे सरकारने सांगितले, अशी खोटी उत्तरे सरकारने देऊ नयेत. आता सक्षम विरोधी पक्षनेता आल्याने सरकारला खोटे उत्तर देता येणार नाही. वडेट्टीवार सरकारला जाब विचारतील असे पटोले यांनी स्पष्ट करत काँग्रेस पक्षाच्यावतीने वडेट्टीवार यांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Vijay Vadettiwar Competent Leader of Opposition, Will Do Justice to People's Questions - Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.