मागच्या सरकारला शेतकरी कर्जमाफीवर बोलण्याचा अधिकार नाही : विजय वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 11:19 AM2020-02-25T11:19:01+5:302020-02-25T11:30:17+5:30
ठाकरे सरकारकडून करण्यात आलेली कर्जमाफी ही फसवी असून, सरकारने सरसकट कर्जमाफीचा शब्द पाळला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफीची यादी सोमवारी जाहीर केली आहे. यावरून विरोधकांकडून सरकारावर टीका केली जात असताना, कर्जमाफीवर बोलण्याचा अधिकार त्यांना नसल्याचं प्रत्युत्तर काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ठाकरे सरकारनं शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात आलं आहे. एप्रिल महिन्याअखेर कर्जमाफीचा लाभ टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातील 34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती एकत्र करण्यात आली होती.
तर ठाकरे सरकारकडून करण्यात आलेली कर्जमाफी ही फसवी असून, सरकारने सरसकट कर्जमाफीचा शब्द पाळला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मागच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयांच्या आणि बँकेच्या खेट्या माराव्या लागत असे. त्यामुळे मागच्या सरकारला शेतकरी कर्जमाफीवर बोलण्याचा अधिकार नसून, त्यांनी पाच वर्षे फक्त कर्जमाफीचा गाजावाजा केला असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.