विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते घोषित; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काढला चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 01:05 PM2023-08-03T13:05:32+5:302023-08-03T15:15:24+5:30

अलीकडेच विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस विधिमंडळाकडून विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला होता. त्यानुसार आज विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली

Vijay Vadettiwar declared Leader of Opposition in Legislative Assembly; CM Eknath Shinde target him | विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते घोषित; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काढला चिमटा

विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते घोषित; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काढला चिमटा

googlenewsNext

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिक्त होती. अजित पवार यांनी राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेता कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली होती. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे आमदार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले, त्यामुळे विरोधात काँग्रेस आमदारांची संख्या अधिक असल्याने या जागेवर काँग्रेसनं दावा केला होता.

अलीकडेच विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस विधिमंडळाकडून विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला होता. त्यानुसार आज विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वड्डेटीवार यांचे अभिनंदन करत त्यांना चिमटेही काढले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विजय वडेट्टीवारांचे सरकारकडून अभिनंदन, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. वडेट्टीवार विदर्भातील नेते आणि आमचे उपमुख्यमंत्रीदेखील विदर्भातले आहेत. विदर्भाच्या पाण्याला वेगळा गुण असतो. त्यामुळे राज्याच्या इतिहासात ४  विदर्भाचे मुख्यमंत्री मिळाले. विदर्भाला देशातील राष्ट्रपती मिळाले. पाहुणचार करण्यात विदर्भाचा हातभार कुणी धरू शकत नाही असं कौतुक शिंदेंनी केले.

तसेच विदर्भातील जेवणही कडक असते. तसाच स्वभाव विदर्भातील लोकांमध्ये आहे. विजय वडेट्टीवार यांच्यावर थोडा अन्याय झाला आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच त्यांना या जागेवर बसवायला हवं होते. अधिवेशन विना विरोधी पक्षनेता होईल असं वाटत होते. परंतु वडेट्टीवार ही कसर भरून काढतील. २ दिवस सभागृहाचे कामकाज आहे. वडेट्टीवार मागे बसायचे पण तुम्ही पुढे कधी येणार असं विचारायचो. पण होईल २-३ दिवसांत असं सांगायचे. सत्ताधारी-विरोधक ही लोकशाहीची २ चाके आहेत. सक्षम विरोधी पक्ष असायला हवा. सरकार चुकीचं करत असेल, कुठे कमी पडले तर त्यांनी जनतेच्या हितासाठी सभागृहात बोलणे ही काळाची गरज आहे. पण सरकार जेव्हा चांगले काम करत असेल तेव्हा त्यांचे कौतुक करणे हेदेखील चांगल्या विरोधी पक्षाचे लक्षण असते असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, कुठल्याही सत्तेत विरोधी पक्षनेत्याला फार महत्त्व असते. विरोधी पक्षनेता झाल्यानंतर जेव्हा आपली सत्ता येते, तेव्हा दुर्दैवाने तशी खाती मिळत नाही. ही वस्तूस्थिती आहे. निवडणुकीला १३-१४ महिने आहेत. अशा परिस्थितीत विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते बनवले आहे. या पदाचा तुम्ही चांगला उपयोग कराल अशी अपेक्षा आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Web Title: Vijay Vadettiwar declared Leader of Opposition in Legislative Assembly; CM Eknath Shinde target him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.