"मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला तरच..."; पंतप्रधान मोदींच्या माफीनाम्यावर वडेट्टीवारांचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 05:49 PM2024-08-30T17:49:53+5:302024-08-30T17:56:47+5:30
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.
Vijay Wadettiwar on PM Modi Apology : मालवणच्या राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळ्याची दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी घडली. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र एका वर्षाच्या आतच हा पुतळा कोसळल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेवर पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत. पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागितली आहे. मात्र निवडणुकांमुळे ही माफी मागितल्याचा संशय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.
नौदल दिनाचे औचित्य साधून राजकोट किल्ल्यावरील २८ फुटी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलं होतं. मात्र आठच महिन्यात पुतळा कोसळला. पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आलीय. अशातच महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी एका कार्यक्रमात जाहीर माफी मागितली आहे. मात्र आता या माफीनाम्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.
"छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, त्यानंतर पाच दिवसांनी महाराष्ट्रात दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान यांनी आज शिवप्रेमींची माफी मागितली. पण पुतळा कोसल्यावर राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहत होते म्हणून पुतळा कोसळला. ज्याने पुतळा बनवला तो शिल्पकार फरार आहे, कारवाई नाही. मंत्री केसरकर म्हणाले काही तरी चांगले व्हायचे असेल म्हणून पुतळा कोसळला असेल. सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी असताना पुतळा प्रकरणी बोटं नौदल कडे दाखवले! पंतप्रधान यांनी माफी मागितल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेतला असता तर त्या माफीवर विश्वास बसला असता. पण कृतीत काहीच नाही, फक्त पोकळ शब्द आहेत! त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुका समोर ठेवून फक्त माफी मागितली का हा संशय येतोय," असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माफीनामा
"काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जे काही घडलं, ते अत्यंत दुख:द आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. तसेच जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतात, या घटनेमुळे त्यांच्या मनालाही जे वेदना झाल्या आहेत. मी त्यांच्यापुढेही नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. मी महाराष्ट्राच्या भूमीत येऊन सर्वात आधी छत्रपती शिवरायांची माफी मागितली आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.