"महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाही"; सरकारी योजनेच्या खर्चावरुन वडेट्टीवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 10:17 PM2024-08-15T22:17:27+5:302024-08-15T22:19:55+5:30

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Vijay Wadettiwar criticized the grand Mahayuti government over the Ladaki Bahin Yojana | "महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाही"; सरकारी योजनेच्या खर्चावरुन वडेट्टीवारांची टीका

"महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाही"; सरकारी योजनेच्या खर्चावरुन वडेट्टीवारांची टीका

Vijay Wadettiwar on Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या महत्त्वाकांशी अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील महिलांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधानाआधीच महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहि‍णींना या योजनेअंतर्गत दोन महिन्यांचे पैसे देऊन ओवाळणी दिली आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत. १७ ऑगस्टपर्यंत हे पैसे सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या योजनेवरुन महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

महायुती सरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना राज्य सरकार प्रति महिना १५०० रुपयांचा हप्ता देणार आहे. यातील पहिल्या दोन महिन्यांचे पैसे १७ ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. मात्र त्याधीच महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यावरुनच विजय वडेट्टीवार सरकारवर टीका केली आहे. या योजनेच्या प्रचारासाठी १९९ कोटी ८१ लाख खर्च केला जाणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

"जेमतेम मोजक्या बहिणींना योजनेचा पहिला हफ्ता मिळाला, परंतु ढोल पिटण्यासाठी मात्र १९९ कोटी ८१ लाख रुपयांचे बिल राज्याच्या तिजोरीवर लावण्यात आले. महायुती सरकारच्या घोषणांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आधीच २७० कोटींचा जीआर काढला असताना आता फक्त लाडकी बहीण योजनेच्या प्रचारसाठी तब्बल १९९ कोटी ८१ लाख खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे १५ ऑगस्ट सुट्टीचा दिवस असताना हा जीआर काढण्यात आला आहे. सुट्टीच्या दिवशी तर सोडा, कामकाजाच्या दिवशी सुद्धा मंत्रालयात जनतेची कामे होत नाही. दुसरीकडे मात्र महायुतीत शामिल पक्षांच्या हिताचे सरकारी निर्णय घेण्यासाठी १५ ऑगस्टचा दिवस सुद्धा सत्ताधारी आणि शासकीय यंत्रणा सोडत नाही. स्वतःच्या हितासाठी राबणारे किती हे तत्पर सरकार असेच म्हणावे लागेल," असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

"ह्या सरकारला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, युवकांना नोकऱ्या द्यायला पैसे नाही, पण स्वतःची बढाई करण्यासाठी जाहिरातीसाठी मात्र भरमसाठ खर्च सुरू आहे. दिल्लीत बसलेल्या सरदारांना खुश ठेवण्यासाठी आधीच महाराष्ट्र गहाण ठेवला आहे, येणाऱ्या विधानसभेत मतांसाठी महायुतीतील तीनही पक्ष मिळून महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाही," असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
 

Web Title: Vijay Wadettiwar criticized the grand Mahayuti government over the Ladaki Bahin Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.