"ओबीसींना आधार योजनेचा लाभ कधी? वसीतगृहे कधी मिळणार?"; वडेट्टीवारांचे सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 01:35 PM2023-12-08T13:35:52+5:302023-12-08T13:37:16+5:30
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला प्रश्नांचा भडीमार
Vijay Wadettiwar, Winter Session Maharashtra : राज्यातील मागासवर्गीय शाळांचा मोठा प्रश्न आहे. आश्रम शाळांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे कधी भरणार? ओबीसींना आधार योजनेचा लाभ का देत नाही, तो लाभ त्यांना कधी मिळणार? ओबीसी विद्यार्थ्यांची वसतीगृहे कधी सुरू करणार? अशा प्रश्नांचा भडीमार विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सरकारवर केला. विधानसेभत लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान ते बोलत होते.
"यावर्षी आधार योजनेचा लाभ ओबीसी विद्यार्थ्यांना सरकारने दिला पाहिजे. पण अजून हा लाभ मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह नाही. त्यांची वसतीगृहे सुरू करावीत. ही मुलं जाणार कुठे शिकणार कशी? याचा विचार सरकारने करावा. ओबीसी विभागाच्या तीन मीटिंग झाल्या असे सर्वजण बोलले. पण वसतिगृह कधी सुरू करणार सांगितले नाही. ७२ वसतिगृह कधी सुरू करणार? हा खरा प्रश्न आहे. पीएचडीसाठीची शिष्यवृत्तीची संख्या वाढवावी. लोकसंख्येचा विचार करून यापुढे शिष्यवृत्तीची संख्या निश्चित करण्यात यावी", अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
वडेट्टीवार यांनी केलेल्या मागण्यांना सरकारकडून सकारात्मक उत्तर देण्यात आले. परदेशी शिष्यवृत्ती आता ५० वरून ७५ विद्यार्थ्यांना केली असून सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दिली आहे. सरकारने ओबीसी वसतिगृहाबाबत आज सभागृहात भूमिका स्पष्ट केली. ७२ पैकी ५२ वसतीगृहे सुरू करू, रिक्त पदांच्या प्रस्तावाला मंजुरी देऊ, असे सरकारकडून सांगण्यात आले.