विजयाने मुख्यमंत्र्यांचे भाजपात वजन वाढले

By admin | Published: February 24, 2017 06:01 AM2017-02-24T06:01:26+5:302017-02-24T06:01:37+5:30

मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या बरोबरीने मिळविलेला विजय, ठाणे वगळता अन्य आठ महापालिकांमध्ये

Vijay won the weight of the Chief Minister in BJP | विजयाने मुख्यमंत्र्यांचे भाजपात वजन वाढले

विजयाने मुख्यमंत्र्यांचे भाजपात वजन वाढले

Next

यदु जोशी / मुंबई
मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या बरोबरीने मिळविलेला विजय, ठाणे वगळता अन्य आठ महापालिकांमध्ये दृष्टिक्षेपात आलेली सत्ता यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय वजन वाढले आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपाला नंबर एकचा पक्ष केल्यानंतर आता महापालिका व जिल्हा परिषदांमध्येही फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठे यश मिळाल्याने त्यांच्या नेतृत्वाला झळाळी मिळाली आहे.
१९९१मध्ये नगरसेवक म्हणून महापालिकेत पाऊल ठेवणारे फडणवीस यांच्या लोकप्रतिनिधीपदाच्या कारकिर्दीला बुधवारीच २५ वर्षे पूर्ण झाली आणि गुरुवारच्या निकालांनी त्यांना विजयाची भेट मिळाली आहे. ते मुख्यमंत्री झाले तेव्हा ‘दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र’ असे वर्णन करण्यात आले होते. गुरुवारच्या निकालानंतर त्या वर्णनाची शाई अधिक गडद झाली आहे.
मुंबईच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला थेट अंगावर घेण्याची हिंमत आतापर्यंत भल्याभल्यांनी केलेली नव्हती. काँग्रेसचे बहुतेक मुख्यमंत्रीदेखील मुंबई जणू शिवसेनेची मक्तेदारी असल्याचे समजूनच निवडणुकीकडे पाहत असत. फडणवीस हे असे पहिले मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान दिले आणि भाजपाला शिवसेनेच्या बरोबरीने आणण्यात ते यशस्वी झाले. ‘भाजपाची औकात दाखवू’ आणि ‘परिवर्तन तर होणारच’ असे त्यांनी ठासून सांगितले. मुंबईकरांसमोर विकासाचा आणि पारदर्शकतेचा अजेंडा त्यांनी मांडला आणि राजकीय यशही पक्षाला मिळवून दाखविले.
नागपूरचा गड भाजपाने राखला. तेथील दिग्गज नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सलोखा राखत बहुतेक सूत्रे त्यांनी गडकरींच्या हाती दिली आणि स्वत: राज्यातील इतर महापालिका आणि जिल्हा परिषदांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. विशेषत: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्यांनी मांडलेल्या विकासाच्या अजेंड्याला मतदारांनी पसंती दिल्याचे निकालावरून दिसते. ‘मी जिथेही प्रचाराला जातो तिथे लोकांना माझ्यामध्ये एक विश्वास असल्याचे जाणवत होते’ असे मुख्यमंत्री प्रचार संपल्यानंतर सांगत होते. निकालामध्येही तेच दिसून आले आहे. ‘माझा कोणताही गट नाही, तुमचाही तो नसावा, आपल्या सर्वांसाठी पक्ष हेच सर्वस्व असल्याचे सांगत त्यांनी भाजपांतर्गत गटबाजी राहणार नाही, याची काळजी घेतली. एकाच जिल्ह्यात पक्षाचे दोन दिग्गज नेते असतील तर एकाकडे महापालिका आणि दुसऱ्याकडे जिल्हा परिषदेची जबाबदारी देत त्यांनी दोघांमध्ये स्पर्धा लावली.

सबकुछ ‘सीएम’

महापालिका, जिल्हा परिषदांचे  उमेदवार ठरविण्यापासून प्रत्येक बारीकसारिक गोष्टीत फडणवीस यांनी ‘वर्षा’वर अक्षरश: रात्ररात्र जागून लक्ष घातले. गेले दीड महिना ते पहाटे तीनच्या आधी झोपले नाहीत. छोट्यांपासून मोठी सामाजिक समीकरणे, बेरजेचे राजकारण,
मर्यादित ताकद असलेली पण त्या-त्या भागातील निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतील, अशी माणसे जाणीवपूर्वक पक्षात आणण्यापासूनच्या राजकीय खेळींवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले.

Web Title: Vijay won the weight of the Chief Minister in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.