महापालिकेत 'विजयोत्सव'!

By admin | Published: May 9, 2014 09:51 AM2014-05-09T09:51:01+5:302014-05-09T09:51:01+5:30

क्रेनच्या सहाय्याने घातलेला लक्षवेधी पुष्पहार..अन् गुडेवारसाहेब तुम आगे बढो असा हजारो लोकांनी दिलेला नारा अशा 'न भूतो...' वातावरणात चंद्रकांत गुडेवार यांनी महापालिकेचा पुन्हा पदभार स्वीकारला.

'Vijayotsav' in the municipal corporation! | महापालिकेत 'विजयोत्सव'!

महापालिकेत 'विजयोत्सव'!

Next
>सोलापूर: दिवसभर खणखणत असलेले फोन....दुपारी तीन वाजल्यापासून गर्दी...कार्यालयाबाहेर फुलांच्या पायघड्या... ढोलीबाजाचा दणदणाट... इंद्रभुवनासमोर उभारलेली विजयाची गुढी... क्रेनच्या सहाय्याने घातलेला लक्षवेधी पुष्पहार..अन् गुडेवारसाहेब तुम आगे बढो असा हजारो लोकांनी दिलेला नारा अशा 'न भूतो...' वातावरणात चंद्रकांत गुडेवार यांनी महापालिकेचा पुन्हा पदभार स्वीकारला.
काँग्रेस नगरसेवकांनी पाण्यासाठी केलेले आंदोलन आणि त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक यामुळे गुडेवार यांनी सोमवारी पदभार सोडून शासनाकडे बदलीची मागणी केली होती. याच कारणावरुन शहरात तीन दिवस गुडेवारांसाठी आंदोलने करण्यात आली. याची दखल घेऊन शासनाने देखील गुडेवारांना मनपाचा तत्काळ पदभार स्वीकारावा, असा आदेश दिला होता. गुडेवार चार वाजता पदभार स्वीकारणार असल्यामुळे इंद्रभुवनाला गुरुवारी आगमनाची प्रतीक्षा लागली होती. आयुक्त कार्यालयात दिवसभर साहेब कधी येणार याची विचारपूस करण्यासाठी फोन खणखणत होते. दुपारी तीन वाजल्यापासून महापालिकेत कामगार, नागरिक, पीबी ग्रुपचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते जमू लागले होते. जसजसा घड्याळाचा काटा चारकडे सरकत होता तशा प्रत्येकाच्या नजरा आयुक्तांच्या आगमनाकडे लागल्या होत्या. 
त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेने इंद्रभुवनासमोर गुढी उभारली तर पीबी ग्रुपने कार्यालयाबाहेर गुलाबांच्या पायघड्या टाकल्या होत्या. मनपा कर्मचार्‍यांनी देखील आयुक्त कार्यालय फुलांनी सजविले होते. ढोलीबाजा आणि गर्दी यामुळे वातावरण भारावून गेले होते. सव्वाचार वाजले आणि आयुक्तांची गाडी मुख्य प्रवेशद्वारावर आली. एकच जल्लोष झाला. फटाके फोडले, पेढे वाटले तर काहींनी ठेका धरुन डान्स केला. त्याचवेळी वरुणराजाने देखील हलक्या सरींनी आयुक्तांचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार आडम मास्तर, नगरसेवक आनंद चंदनशिवे, शिवसेनेचे प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, कामगार नेते अशोक जानराव, सुरेश फलमारी, उषा शिंदे, जगदीश पाटील यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचार्‍यांनी जल्लोषपूर्ण वातावरणात आयुक्तांचे स्वागत केले. पीबी ग्रुपचे आनंद चंदनशिवे यांनी क्रेनच्या सहाय्याने गुडेवार यांना घातलेल्या भल्या मोठय़ा पुष्पहाराने लक्ष वेधले.
नाद करायचा नाही
'नाद नाय करायचा, गुडेवारांचा नाद नाय करायचा' या गाण्याच्या ठेक्यामुळे वातावरणात अधिकच रंग भरला. इंद्रभुवनासमोरील वारद पुतळ्याजवळ नागरिकांनी आयुक्तांना फेटा बांधून तसेच पेढा भरवून स्वागत केले. भारावलेले वातावरण पाहून आयुक्त गुडेवार देखील भावनावश झाले होते. बँजोच्या गाडीमध्ये उभा राहून त्यांनी सर्वांचे आभार मानले.
स्वप्न साकार करू 
दोन दिवसांपूर्वी मी पदभार सोडायला नको होता, मात्र त्याशिवाय तुमचे प्रेमही कळाले नसते (हशा...), अशा भावना आयुक्त गुडेवार यांनी व्यक्त केल्या. शहराचे नावलौकिक होईल असे काम करुन दाखवू . शहराचे स्वप्न साकार करू, तुमचे प्रेम असेच राहू द्या, असे ते म्हणाले. 
वर्षभरात पाणीप्रश्न मिटेल. पाण्याचे जे जे विषय मनपा सभागृहापुढे निर्णयासाठी आहेत त्याबाबत मी महापौरांशी बोलणार आहे. लवकरच या विषयांना मंजुरी देण्यात येईल. - चंद्रकांत गुडेवार, मनपा आयुक्त

Web Title: 'Vijayotsav' in the municipal corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.