"आज तू हवी होतीस शीतल..."; लेकीच्या आठवणीने विकास आमटे झाले भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 07:33 PM2021-01-26T19:33:40+5:302021-01-26T19:36:51+5:30
Dr Sheetal Amte News : बाबा आमटे यांच्या नात व डॉ. विकास व डॉ. भारती आमटे यांच्या कन्या डॉ. शीतल आमटे यांचा आज वाढदिवस आहे.
मुंबई - आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या सीईओ, कर्मयोगी बाबा आमटे यांच्या नात व डॉ. विकास व डॉ. भारती आमटे यांच्या कन्या डॉ. शीतल आमटे यांचा आज वाढदिवस आहे. लेकीच्या आठवणीने डॉ. विकास आमटे भावूक झाले आहेत. "आज तू हवी होतीस शीतल..." असं म्हणत त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भावनिक ट्विट केलं आहे. "आज शीतलचा वाढदिवस. आज तू हवी होतीस शीतल. असा एकही दिवस जात नाही, जेव्हा तुझी आठवण येत नाही. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा" असं विकास आमटे यांनी म्हटलं आहे.
विकास आमटे यांनी आपल्या ट्विटमध्ये शीतल आमटे यांच्यासोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. डॉ. शीतल आमटे यांनी आनंदवनातील आपल्या निवासस्थानी 30 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. शीतल यांच्या मृत्यूचे गुढ कायम असताना त्यांनी जून 2020 मध्ये झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. शीतल आमटे या काही वर्षांपासून मानसिक तणावात होत्या. त्या मृत्यूच्या सहा महिन्यांपूर्वीपासून नागपूर येथील मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत असल्याची बाबही निष्पन्न झाली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी काही दिवसांपूर्वी दिली आहे.
आज शीतलचा वाढदिवस. आज तु हवी होतीस शीतल. असा एकही दिवस जात नाही, जेव्हा तुझी आठवण येत नाही. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂 😞 #HappyBirthdaySheetal#happybirthdaypic.twitter.com/0q3LstLM5S
— Dr. Vikas Baba Amte (@drvikasamte) January 26, 2021
21 नोव्हेंबर 2020 रोजी शीतल यांनी त्यांच्या नेहमीच्या फार्मसिस्टकडे प्राणघातक लेथल इंजेक्शन विषयी विचारणा केली होती. काही कुत्रे अल्सरच्या त्रासाने पीडित आहे. त्यांना वाचविण्यात काही अर्थ नाही, असे कारण देत तीन प्रकारचे प्रत्येकी पाच इंजेक्शन मागविले होते. वास्तविक, आनंदवनातील रुग्णालयात अशा प्रकारचे इंजेक्शन सामान्यत: वापरले जात नाही, याकडेही पोलीस अधीक्षक साळवे यांनी लक्ष वेधले.
घटनास्थळावरून एका इंजेक्शन चे ॲम्पोल फुटलेल्या स्थितीत आढळले. तसेच वापरलेली सिरींजही मिळून आली होती. मात्र सुसाईड नोट आढळली नाही, ही बाबही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केली. शवविच्छेदन अहवालानुसार डॉ. शीतल यांचा मृत्यू श्वास रोखल्यामुळे झाल्याचेही पोलीस अधीक्षक साळवे यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु त्यांच्या उजव्या हातावर इंटरावेनस इंजेक्शनचे व्रण होते. तपासात घातपात झाल्याबाबतचा कोणताही सकृतदर्शनी पुरावा आढळून आला नसल्याचंही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी याआधी सांगितलं आहे.