राष्ट्रवादीच्या पडझडीत विखे पाटलांचा मोठा वाटा ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 12:15 PM2019-07-31T12:15:58+5:302019-07-31T12:17:27+5:30
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विखे पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेते भाजपमध्ये येण्यासाठी आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. त्यांचे ते वक्तव्य आता खरे होताना दिसत आहे. दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्याचा धडाका लावला आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्यासह आमदार वैभव पिचड, शिवेंद्रसिंह राजे भोसले, संदीप नाईक, कालिदास कोळंबकर आणि चित्रा वाघ यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. या दिग्गज नेत्यांच्या भाजप प्रवेशात नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करून मंत्री झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरली. याबद्दल खुद्द मधुकर पिचड यांनीच खुलासा केला.
लोकसभा निवढणुकीत तत्कालीन काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांना काँग्रेसकडून अहमदनगर मतदार संघातून निवडणूक लढवायची होती. परंतु, राष्ट्रवादीने हा मतदार संघ देण्यास नकार दिला. त्यामुळे विखे पाटलांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. पर्याय नसल्यामुळे सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय नगरमधून निवडूनही आले. त्यानंतर काही दिवसातच राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करून मंत्रीपद पदरात पाडून घेतले.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विखे पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेते भाजपमध्ये येण्यासाठी आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. त्यांचे ते वक्तव्य आता खरे होताना दिसत आहे. दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्याचा धडाका लावला आहे.
मधुकर पिचड म्हणाले की, भाजपमध्ये येण्याचा मार्ग आम्हाला राधाकृष्ण विखे पाटील यांनीच दाखवला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोडभरून कौतुक केले. तसेच देश आता नरेंद्र मोदी यांच्यासोबत असून आपणही त्यांच्यासोबत गेलं पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळे भाजपचा मार्ग धरल्याचे पिचड यांनी सांगितले.