विखें पाटलांच्या पत्नीलाही हवी विधानसभेची उमेदवारी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 12:40 PM2019-07-30T12:40:24+5:302019-07-30T12:43:24+5:30

राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे यांना सुद्धा संगमनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु असून, त्यासाठी त्या सुद्धा इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

Vikhe Patil wife Will fight Assembly elections | विखें पाटलांच्या पत्नीलाही हवी विधानसभेची उमेदवारी ?

विखें पाटलांच्या पत्नीलाही हवी विधानसभेची उमेदवारी ?

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपने घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीत भाजपकडूनच घराणेशाही होत असल्याची चर्चा आहे. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण मंत्री पद आणि मुलगा सुजय विखे यांना लोकसभेत उमेदवारी देण्यात आली असतानाचा आता, राधाकृष्ण विखेंच्या पत्नी शालिनी विखे ह्या सुद्धा भाजपकडून संगमनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न सुद्धा भाजपकडून सुरु असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप करत आपल्या सभेतून अनेकदा टीका केल्या होत्या. आता राज्याच्या राजकरणात भाजपमध्ये घराणेशाही होत असल्याची चर्चा पहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे भाजपकडून खासदार म्हणून निवडून आले. त्यांनतर राधाकृष्ण विखेंना गृहनिर्माण मंत्री पद देण्यात आले होते. त्याच बरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून त्यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. तर आता राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे यांना सुद्धा संगमनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु असून, त्यासाठी त्या सुद्धा इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

१९८५ पासून हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सलग सात वेळापासून येथून मताधिक्याने निवडून येत आहे. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. मात्र सेनेकडे थोरात यांच्याविरोधात सक्षम असा उमेदवार नसल्याने, हा मतदारसंघ भाजपकडे घेण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्याच बरोबर या मतदारसंघातून भाजपकडून शालिनी विखे यांच्या नावाची चर्चा विखे गटात सुरु आहे. जर शालिनी विखेंना भाजपने या मतदारसंघातून रिंगणात उतरवले तर, भाजपवर घराणेशाहीची टीका होण्याची शक्यता आहे.

थोरात व विखे यांच्यात राजकीय संघर्ष असला तरी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची छुपी युती होती. संगमनरेची काही गावे शिर्डी मतदारसंघात तर विखेंच्या प्रभावाखालील काही गावे ही संगमनेर मतदारसंघात आहेत. मात्र आता ही दोन्ही नेते थेट विरोधात असल्याने यावेळी संगमनेर मतदारसंघात थोरातांना तर शिर्डीमधून विखेंना आपले गड राखण्यासाठी एकेमेकांचे आव्हान असणार आहे.

 

Web Title: Vikhe Patil wife Will fight Assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.