विखे-थोरात कलगीतुरा अन् चव्हाणांचा सल्ला; दोघे एकत्र बसल्याने नवा प्रश्न उद्भवू नये - नार्वेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 02:16 PM2023-08-03T14:16:49+5:302023-08-03T14:19:30+5:30
हे दोघे एकत्र बसल्याने नवीन प्रश्न निर्माण होऊ नयेत एवढेच, अशी टिप्पणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.
मुंबई : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात या अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या दोन नेत्यांना एकत्र बसून चर्चा करण्याचा आणि मार्गही काढण्याचा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देताच, सभागृहात हशा पिकला. हे दोघे एकत्र बसल्याने नवीन प्रश्न निर्माण होऊ नयेत एवढेच, अशी टिप्पणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.
कुंडेगव्हाण (जि.रायगड) येथून मुंबईतील विकासकामांसाठी वाळू व खडीचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून होत असलेल्या गैरव्यवहाराबाबतचा मूळ प्रश्न भाजपचे प्रशांत बंब यांनी विचारला होता. हा धागा पकडून मग सर्वपक्षीय सदस्यांनी वाळू समस्येवरून प्रश्नांची सरबत्ती केली.
धोरणात बदल करण्याची तयारी -
वाळू धोरणाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे कशी करता येईल, यासाठी सभागृहातील सर्वपक्षीय सदस्यांच्या सूचनांचे मी स्वागतच करेन. त्यानुसार, धोरणात बदल करण्याचीही तयारी आहे, असे विखे पाटील म्हणाले.
- तेव्हाच ज्येष्ठ सदस्य अशोक चव्हाण उभे राहिले. ‘विखे पाटील आणि बाळासाहेब हे दोघेही मातब्बर नेते आहेत; एकाच जिल्ह्यातील आहेत.
- या विषयावर एकत्र बसून ते प्रश्न मार्गी लावतील का?’ असे चव्हाण यांनी म्हणताच, सभागृहातील वातावरण हलकेफुलके झाले. त्यातच हे दोघे एकत्र बसले, तर नवीन प्रश्न उद्भवू नयेत, अशी कोटी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.