...अन् धड्यातील‘आवडता खेळाडू’ साक्षात भेटला; झेडपी शाळेत सचिन तेंडुलकरची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 07:59 AM2023-02-22T07:59:23+5:302023-02-22T07:59:51+5:30
इयत्ता चौथीच्या मराठी पुस्तकात कोलाज (बायोग्राफी) धड्यात ‘सचिन रमेश तेंडुलकर माझा आवडता खेळाडू’ हा धडा आहे
राजकुमार चुनारकर
चिमूर (जि. चंद्रपूर) : त्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ज्याला आतापर्यंत फक्त टीव्हीवर आणि पाठ्यपुस्तकातील धड्यात बघितलं, तो त्यांचा आवडता खेळाडू चक्क त्यांच्या पुढ्यात उभा होता. होय, अलिझंझाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विक्रमादित्य भारतरत्न सचिन तेंडुलकर दाखल झाला आणि चिमुकली मुले हरखून गेली...
इयत्ता चौथीच्या मराठी पुस्तकात कोलाज (बायोग्राफी) धड्यात ‘सचिन रमेश तेंडुलकर माझा आवडता खेळाडू’ हा धडा आहे. या धड्यातील कॅरेक्टर सचिनने साक्षात या शाळेत येऊन विद्यार्थ्यांशी हितगूज केल्याने विद्यार्थी व शिक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. क्रिकेटचा देव अशी पदवी खेळरसिकांनी बहाल केलेला सचिन ताडोबातील वाघांच्या भेटीसाठी शनिवारपासून चिमूर तालुक्यातील एका रिसॉर्टमध्ये पत्नी अंजली व मित्रपरिवारासोबत मुक्कामी आहे. सोमवारी अलिझंझा बफर गेटमधून दुपारच्या सफारीसाठी जात असताना पावणेतीनच्या सुमारास आदिवासीबहुल पाच-सहाशे लोकसंख्या असलेल्या अलिझंझा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत अचानकपणे सगळे अवतरले. हे अनपेक्षित दृश्य बघून शाळेतील मुख्याध्यापक रमेश बदके व शिक्षक मनीषा बावनकर व विद्यार्थ्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.
धडा पाहताच गहिवरले सचिनचे मन
सचिन तेंडुलकरने शाळेतील विद्यार्थ्यांशी हितगूज केले. दरम्यान, चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पुस्तकात असलेल्या कोलाज नावाच्या (बायोग्राफी) धड्यातील सचिनचा धडा सचिनलाच दाखविला. तो धडा पाहताच सचिनचे मन गहिवरले. थोड्या वेळासाठी सचिन शांत झाला. यानंतर सचिनने विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत भविष्यात तुम्ही काय बनणार, असा प्रश्न केला असता सृष्टी रघुनाथ मेश्राम हिने डॉक्टर आणि जान्हवी सुभाष नागोसे व नैतिक अशोक धारणे यांनी मला इंजिनिअर व्हायचे आहे, असे सांगितले. सृष्टीने समाज व रुग्णाची सेवा, तर नैतिक व जान्हवीने इंजिनिअर क्षेत्रात संशोधनात्मक कार्य करणार असल्याचे सांगितले. सचिनने शाळेची प्रगती जाणून घेतली.