विक्रमादित्य नाटककार आचार्य अत्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 03:50 AM2018-08-12T03:50:41+5:302018-08-12T03:51:29+5:30
साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या अष्टपैलू साहित्याचा आढावा घेणं म्हणजे गगनाला गवसणी घालण्यासारखं आहे. उद्या त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या गाजलेल्या काही नाट्यकृतींची माहिती खास त्यांच्या चाहत्यांसाठी...
- आनंद बोडस
नाटक लिहिणारे आणि नाटककार या दोन्हीत मोठा फरक आहे. नाट्यरसिकांकडून यशस्वितेची पावती मिळवलेली, श्रेष्ठ गुणवत्तेची परंतु कमी संख्येतील नाटके रचणारे काही नाटककार असतात. यशस्वितेची पावती सातत्याने मिळवणारी, श्रेष्ठतम गुणवत्तेची बहुसंख्य नाटके वर्षानुवर्षे निर्माण करणारे नाटककार दुर्मीळ असतात. मराठी भाषेतील असे दुर्मीळ व एकमेव नाटककार म्हणजे साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आहेत.
१९३३ सालापासून पुढील ३४ वर्षे अत्रे साहेबांनी निर्माण केलेली बहुसंख्य यशस्वी नाटके सातत्याने सादर होत राहिली हा इतिहास आहे. त्यांच्या नाट्यप्रयोगांनी अनेक विक्रमी पराक्रम नोंदवले. त्याचा हा संक्षिप्त आढावा आहे. आचार्य अत्रेंच्या ‘साष्टांग नमस्कार’ या पहिल्याच नाटकाचे शेकडो प्रयोग व्यावसायिक नाट्यसंस्था बालमोहनने केले. तसेच महाराष्ट्रातील त्या काळातील बहुतेक महाविद्यालयांनी आणि हौशी नाटक मंडळींनी अनेक वर्षे केले. हमखास प्रेक्षकप्रिय होणारे नाटक ही पदवी ‘साष्टांग नमस्कार’ला प्रथम मिळाली. तीच पदवी अत्रेंच्या अनेक नाटकांना रसिकांनी दिली.
अत्रेंच्या ‘घराबाहेर’ या नाटकाने अपूर्व व अलौकिक असे तीन-चार पराक्रम १९३४ साली केले. पुण्यात तुडुंब गर्दीत दोन महिने रोज प्रयोग केल्यानंतर बालमोहन कंपनी मुंबईच्या रॉयल आॅपेरा हाउस या नाट्यगृहात मुक्कामाला आली. ‘घराबाहेर’ची प्रसिद्धी मुंबईकरांच्या कानावर असल्यामुळे पहिल्या प्रयोगापासूनच सर्व तिकिटे पहिल्या एक-दोन तासांत विकली जाऊ लागली. त्या काळात आॅपेरा हाउसमध्ये ‘घराबाहेर’चे एक आठवडाभर चार प्रयोग सादर होत. सतत साडेतीन महिने ‘घराबाहेर’चे प्रयोग आॅपेरा हाउसमध्ये होत राहिले. एकाच नाटकाचा असा विक्रम बालगंधर्वांना, किर्लोस्कर मंडळी, बळवंत मंडळी यांनाही करता आला नव्हता. ‘घराबाहेर’ची सर्व तिकिटे संपली हे जनतेला समजावे म्हणून अनंत हरी गद्रे यांनी ‘हाउसफुल्ल’चे फलक नाट्यगृहाबाहेर लावायची युक्ती राबवली. ती युक्ती एवढी यशस्वी झाली की आजही नाट्य व सिनेक्षेत्रात ‘हाउसफुल्ल’चे फलक झळकत असतात. ‘घराबाहेर’ या अत्रेंच्या नाटकामुळे व अनंत हरी गद्रेंमुळे ‘हाउसफुल्ल’ची देणगी मिळाली हे विसरता येत नाही.
सतत साडेतीन महिने ‘घराबाहेर’चा प्रत्येक प्रयोग हाउसफुल्ल व्हायचा. आताच्या आकाशवाणीला त्या काळात ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ हे नाव होते. त्या रेडिओ कंपनीने ‘आॅपेरा हाउस’मधून ‘घराबाहेर’च्या संपूर्ण प्रयोगाचे चार तासांचे थेट प्रक्षेपण केले. हे भाग्य त्याअगोदर व त्यानंतर कोणत्याही नाटकाला लाभलेले नाही. ‘निर्भीड’ नामक नियतकालिकाने ‘घराबाहेर’ नाटकाच्या बाजूची व विरुद्धची लेखी मते प्रेक्षकांकडून मागवून ‘घराबाहेर’ विशेषांकात प्रसिद्ध केली व त्या सर्वांचे निवारण अत्रेंनी त्याच अंकात केले. असे चार-पाच विक्रमी पराक्रम ‘घराबाहेर’च्या निमित्ताने नाटककार अत्रे यांनी नोंदवले.
१९३६ च्या उत्तरार्धात रंगमंचावर आलेल्या ‘लग्नाची बेडी’ या अत्रेंच्या नाटकाने पराक्रमांची रासच निर्माण केली. एकाच वेळी वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या व्यावसायिक व हौशी नाट्य संस्था व महाविद्यालये ‘लग्नाच्या बेडी’चे प्रयोग सादर करताना या महाराष्ट्राने पाहिले आहे. १९३६ पासून पुढील दोन दशकांत रीतसर लेखी परवानगी घेऊन ‘लग्नाची बेडी’चे साडेपाच हजारांहून अधिक प्रयोग झाल्याची नोंद झाली आहे. ज्या संस्था, क्लबना पूर्ण नाटक करणे शक्य नव्हते त्यांनी एखादा अंक अथवा एखादा प्रवेश करण्यासाठी ‘लग्नाची बेडी’चा आधार घेतला. अत्रेंच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकाने घडवलेला इतिहास व नोंदवलेले विक्रम सांगायला एक पुस्तकच लिहावे लागेल.