विक्रांतने ६0 कोटींना डुबवले
By admin | Published: June 12, 2015 04:11 AM2015-06-12T04:11:10+5:302015-06-12T04:11:10+5:30
भारत-पाकिस्तान युद्धात गौरवशाली कामगिरी करणारी विक्रांत युद्धनौका नुकतीच भंगारात काढण्यात आली. मात्र ही युद्धनौका भंगारात काढणाऱ्या आयबी
मुंबई : भारत-पाकिस्तान युद्धात गौरवशाली कामगिरी करणारी विक्रांत युद्धनौका नुकतीच भंगारात काढण्यात आली. मात्र ही युद्धनौका भंगारात काढणाऱ्या आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडला त्याचे भाग विकल्यानंतरही तब्बल ६0 कोटी ५७ लाख रुपये नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
भारत-पाकिस्तान युद्धात गौरवशाली कामगिरी केल्यावर ३१ जानेवारी १९९७ साली विक्रांत युद्धनौका नौदलाच्या सेवेतून निवृत्त झाली. त्यानंतर नौदलानेही त्यावर संग्रहालय साकारून पर्यटकांसाठी ते खुले केले. मात्र देखभाल आणि दुरुस्तीच्या मागे येणारा कोट्यवधींचा खर्च पाहता ती भंगारात विकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडने विक्रांतला ६३ कोटी २ लाख रुपयांना विकत घेतले. भंगारात निघणाऱ्या विक्रांतला वाचवण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने विक्रांतला भंगारात काढण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु विक्रांत बचाव समितीकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आणि न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यावर स्थगितीही दिली. अखेर न्यायालयाने विक्रांतबाबतची याचिका निकाली काढत स्थगिती उठवली. २0१४च्या डिसेंबरपासून विक्रांत मोडीत काढण्याचे काम सुरू करून ते मार्चपर्यंत पूर्ण करण्यात आले आणि एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विक्रांतच्या सर्व भागांची बाजारभावाने विक्री करण्यात आली. त्यातून मिळालेले उत्पन्न आणि प्रक्रियेसाठी आलेला खर्च पाहता आयबी प्रायव्हेट लिमिटेडला तब्बल ६0 कोटी ५७ लाखांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले. विक्रांत ही आयबीने ६३ कोटी २ लाखांना विकत घेतली आणि त्यानंतर वॅट, आयकर, आॅक्ट्रोय, कस्टम ड्युटी, टोर्इंग यासह ती मोडीत काढताना आलेला खर्च यामुळे आयबीला तब्बल २७ कोटी ५५ लाखांचा खर्चाचा भार सोसावा लागला. विक्रांतच्या सुट्ट्या भागांना बाजारभाव चांगला मिळेल, अशी आशा आयबीला होती. मात्र एकूण ३0 कोटी रुपयांना त्याचे सर्व भाग बाजारात विकले गेले, असे आयबी कंपनीचे संचालक अब्दुल करीम जाका यांनी सांगितले.