विक्रांत केणे खून प्रकरण : नऊ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2017 04:44 AM2017-06-03T04:44:43+5:302017-06-03T04:44:43+5:30

शिवसेनेचे डोंबिवलीतील युवा अधिकारी विक्रांत केणे यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या काका श्रीराम आणि पुतण्या मंगेश भगत यांच्यासह

Vikrant Kane murder case: nine arrested | विक्रांत केणे खून प्रकरण : नऊ जणांना अटक

विक्रांत केणे खून प्रकरण : नऊ जणांना अटक

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शिवसेनेचे डोंबिवलीतील युवा अधिकारी विक्रांत केणे यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या काका श्रीराम आणि पुतण्या मंगेश भगत यांच्यासह नऊ मारेकऱ्यांच्या खारघर भागातून कारसह मुसक्या आवळण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला असून, यातील आणखी पाच जणांचा शोध सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केणे कुटुंबीयांना श्रीराम भगत यांची डोंबिवलीतील आयरे गावातील जमीन विकत हवी होती. ती देण्यास भगत कुटुंबीयांचा विरोध होता. यातूनच उद्भवलेल्या वादातून विक्रांत यांचा मंगेशने श्रीरामच्या सांगण्यावरून रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून खून केल्याची माहिती उघड झाली आहे.
या प्रकरणी श्रीराम भगतसह नऊ जणांना एका कारसह अटक करण्यात आली आहे. श्रीराम भगत (४६), मंगेश भगत (२७), ओंकार भगत (२१), शुभम भगत (१९), पंकज म्हात्रे (२१), प्रदीप नायडू (२४), संजय तुळवे (२०), प्रशांत पवार (२०) आणि शशीकांत उर्फ शशी शांताराम कुळे (२४) रा. आयरे गाव, डोंबिवली अशी अटक केलेल्या कथित आरोपींची नावे आहेत. यापूर्वी यांच्यापैकी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. मारेकरी हे केणे कुटुंबीयांच्या शेजारीच राहत होते.
भगत कुटुंबीयांना जमीन विकायची नसल्यामुळे ते आयरे गावातील त्या जागेवर बांधकाम करण्यासाठी जेसीबीने सफाई करीत होेते. त्याच वेळी ३० मे २०१७ रोजी दुपारी २ वा. च्या सुमारास श्रीराम यांनी त्या ठिकाणी उभा केलेला जेसीबी बाजूला घेण्यास सांगितल्याचा, तसेच दोन दिवसांपूर्वी झाडे तोडण्यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून, श्रीरामसह इतर १५ ते १६ जणांनी सचिन आणि विक्रांत केणे या दोघा भावांसह त्यांच्या नातेवाईकांना घेराव घातला. या धुमश्चक्रीत श्रीराम यांनी त्यांचे रिव्हॉल्व्हर काढून पुतण्या मंगेशकडे दिले. श्रीरामच्या इशाऱ्यावरूनच मंगेशने विक्रांतच्या पोटावर गोळीबार केला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
डोंबिवली पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू असताना मारेकरी भगत कुटुंबीय हे गोव्यात पळून जाणार असल्याची पक्की माहिती सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सोनसाखळी चोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक वाय. एस. चव्हाण यांच्या पथकाने, तळोजा रोड मुरबी गाव, कोपरा घरकूल येथे १ जून रोजी सापळा लावून, एका कारमधून सायंकाळी ७.१० वा. च्या सुमारास त्यांना पकडले. त्यांची कार खारघर रस्त्याने येत असताना दिसल्यानंतर, पोलिसांनी या कारला अडवून चौकशीअंती या नऊ जणांना अटक केली. या आरोपींना आता डोंबिवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

आणखी पाच जणांचा शोध सुरू
या प्रकरणातील नऊ जणांचा शोध लागला असून, आणखी
चार ते पाच फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. घटनेनंतर ते शेजारच्या जिल्ह्यात पसार झाले होते. त्यांच्या गाडीच्या मागावरच पोलीस होते. अखेर गाडीसह त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, हत्येसाठी वापरलेल्या मंगशचे परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरचाही शोध सुरू असल्याचे रानडे यांनी सांगितले.

आता शस्त्र परवान्यांचा सर्व्हे करणार
डोंबिवलीतील या घटनेमुळे आता शस्त्र परवाना असलेल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली भागातील वादग्रस्त परवानाधारकांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यातूनही आवश्यकता वाटल्यास संबंधितांच्या परवान्यांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मकरंद रानडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Vikrant Kane murder case: nine arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.