भंगारात विकलेल्या ‘विक्रांत’चा सध्या गोदीतच मुक्काम!
By admin | Published: May 6, 2014 11:17 AM2014-05-06T11:17:20+5:302014-05-06T11:36:30+5:30
भारतीय नौदलाने भंगारात विकलेल्या ‘विक्रांत’ युद्धनौकेच्या बाबतीत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.
सुप्रीम कोर्टाचा ‘जैसे थे’ आदेश : संरक्षण मंत्रालय, महाराष्ट्र सरकार व प्रतिवादींना नोटिसा
नवी दिल्ली: भारतीय नौदलाने भंगारात विकलेल्या ‘विक्रांत’ युद्धनौकेच्या बाबतीत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.
‘विक्रांत’ भंगारात न विकता तिचे म्युझियम म्हणून जतन करावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ते किरण पैंगणकर यांनी केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारीमध्ये फेटाळली होती. त्याविरुद्ध पैंगणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली विशेष अनुमती याचिका न्या. के. एस. राधाकृष्णन व न्या. विक्रमजीत सेन यांच्या खंडपीठापुढे आली, तेव्हा न्यायालयाने संरक्षण मंत्रालय, महाराष्ट्र सरकार व इतर प्रतिवादींना नोटिसा काढल्या व पुढील सुनावणी होईपर्यंत ‘विक्रांत’च्या बाबतीत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवावी, असा आदेश दिला.
आधी ब्रिटनच्या शाही नौदलात असलेली ही विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलाने ‘सेकंड हॅण्ड’ विकत घेतली होती.
१९९७ मध्ये ती नौदलातून नवृत्त केली गेल्यावर गोदीतच उभ्या असलेल्या ‘विक्रांत’चे म्युझियम केले गेले होते. परंतु ७0 वर्षांच्या या जुन्या युद्धनौकेवर वावरणेही धोक्याचे
असल्याने व ती म्युझियम म्हणून जतन
करून ठेवणे परवडणारे नसल्याने ती भंगारात काढणे हा एकमेव व्यवहार्य मार्ग आहे, अशी संरक्षण मंत्रालयाची भूमिका आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
६३ कोटींना विक्री
च्१९९७ मध्ये नौदलातून नवृत्त झालेली ही युद्धनौका अलीकडेच मुंबईतील आयबी कर्मशियल या कंपनीस ६३ कोटी रुपयांना विकण्यात आली होती. सध्या मुंबई गोदीत उभी असलेली ‘विक्रांत’ तेथून हलविण्यासाठी कंपनीस २0 मे ही अखेरची मुदत होती. आता ‘जैसे थे’ आदेशामुळे युद्धनौका गोदीतच राहील.