विलासरावांनी महाराष्ट्र पुढे नेला

By admin | Published: August 16, 2015 02:01 AM2015-08-16T02:01:26+5:302015-08-16T03:22:05+5:30

विलासराव देशमुख हे कर्तृत्ववान नेते होते. त्यांच्यामुळे लातूरचा लौकिक देशभर झाला. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या धाडसी निर्णयाने आणि साहसी नेतृत्वामुळे

Vilasrao took Maharashtra forward | विलासरावांनी महाराष्ट्र पुढे नेला

विलासरावांनी महाराष्ट्र पुढे नेला

Next

लातूर : विलासराव देशमुख हे कर्तृत्ववान नेते होते. त्यांच्यामुळे लातूरचा लौकिक देशभर झाला. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या धाडसी निर्णयाने आणि साहसी नेतृत्वामुळे महाराष्टाला पुढे नेले, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंदीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काढले. लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शनिवारी आयोजित विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी माजी केंदीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. अशोक चव्हाण, खा. सुनील गायकवाड, आ. दिलीपराव देशमुख, आ. अमित देशमुख, आ. त्र्यंबकनाना भिसे, वैशालीताई देशमुख, अभिनेते रितेश देशमुख, माजी खा. डॉ. जर्नादन वाघमारे, माजी आमदार शिवाजीराव कव्हेकर, माजी मंत्री सतेज पाटील, आ. मधुकरराव चव्हाण, आ. सुधाकर भालेराव, आ. विनायकराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई कव्हेकर, उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, उल्हासदादा पवार, धीरज देशमुख, जेनिलिया देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी पवारांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विलासराव देशगुख यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यानंतर पवार पुढे म्हणाले की, विलासराव हे संकटांना धैर्याने सामोरे जाणारे नेतृत्व होते.
लातूर भूकंपाच्या वेळी मी स्वत: त्यांना पाहिले आहे. ते सर्वसामान्यांचे हित जपायचे. ते आदर्श मंत्री होते. मंत्री म्हणून काम करताना त्यांनी आदर्श घालून दिला. त्यांचा आदर्श राजकारणात नव्याने येणाऱ्या जिल्हा परिषदेतील नेत्यांनी घ्यायला पाहिजे. ते उत्कृष्ट मित्र होते. देशमुख आणि मुंडे यांची मैत्री स्मरणात राहील अशी होती, असेही ते म्हणाले.
माजी केंदीय मंत्री चाकूरकर यांनीही यावेळी विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिला. माझे आणि त्यांचे संबंध भावांप्रमाणे असल्याचे सांगत ते म्हणाले की, ते हिम्मतवाला आणि निधड्या छातीचे राजकारणी होते. मी विधानसभेच्या दोन आणि लोकसभेच्या आठ निवडणुका लढलो. शेवटची एकच लोकसभा निवडणूक लढलो तेव्हा मला विलासरावांच्या मतदारसंघातून सर्वाधिक मते होती. आता नवी पिढी राजकारण करते आहे. सुप्रिया, पंकजा आणि अमित हे आपल्या पित्यांच्या दोन पावले पुढचे राजकारण करतील, असेही ते म्हणाले.
पंकजा मुंडे यांनी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील मैत्रीची आठवण करुन दिली. यावेळी त्यांनी दोघांच्या आवाजाची नक्कल करुन हुबेहुब जुगलबंदीचे चित्र डोळ्यांपुढे उभे केले. खा. अशोक चव्हाण यांनी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली जाण्याने राज्याचे विशेषत: मराठवाड्याचे खूप नुकसान झाल्याचे सांगितले. यावेळी खा. सुनील गायकवाड आणि आ. अमित देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी जि. प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामानुज रांदड व अब्दुल गालिब शेख यांनी केले तर आभार अण्णासाहेब पाटील यांनी मानले. (प्रतिनिधी)

शेजारी शेजारी बसूनही एका शब्दाचा संवाद नाही
संपूर्ण अडीच तासाच्या कार्यकमात पंकजा मुंडे आणि शरद पवार हे एकमेकांच्या शेजारी बसले होते. परंतु त्यांनी एकमेकांना एका शब्दांनेही बोलले नाहीत. एकमेकांकडे पाहीलेही नाही. त्यांचे हे एकमेकांना टाळणेही सहजपणे लक्षात येण्यासारखे होते.

दिलीपकुमार आणि दीपिका पदुकोन
शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे या दोघांच्या एकमेकांवरील टोलेबाजीची रंगत यावेळी पवार विरुध्द पंकजा या रुपाने मिळते का ? याची उत्सुकता लातूरकरांना होती. सुरुवातीला बोलताना पंकजा यांनी शरद पवार हे राजकारणातील दिलीपकुमार असल्याचे सांगितले. यावर पवार यांनी भाषण करताना, मी चिञपट पहात नाही, मला त्याची आवडही नाही. परंतु पंकजाने माझा उल्लेख दिलीपकुमार असा का केला हे मला कळाले नाही. म्हणून मी सुध्दा त्यांना एका नायिकेची उपमा द्यायची ठरविले.
यासाठी स्टेजवर असतानाच रितेशला आघाडीची नायिका कोण हे विचारले? त्यांने माधुरी दिक्षितचे नाव सांगितले. पण मी आत्ताच्या पिढीची नायिका कोण ? असे पुन्हा विचारले. त्याने दिपीका पदुकोन हे नाव सांगितले. त्यामुळे पंकजाचा उल्लेख मी दिपीका पदुकोन म्हणून करतो, असे म्हणून ‘मुंडेंना कोपरखळी मारली.

Web Title: Vilasrao took Maharashtra forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.