ओबीसी वगळून सर्व नेत्यांना गावबंदी; ओबीसी समाजाकडून जालन्यात पहिला बॅनर लागला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 03:55 PM2024-06-24T15:55:35+5:302024-06-24T15:55:53+5:30
दोन्ही समाजांच्या आरक्षणाचे केंद्र असलेल्या जालना जिल्ह्यात आरक्षणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
आरक्षण वादामुळे राज्यातील वातावरण दुषित होऊ लागले असून ओबीसी समाजाच्यावतीने जालन्यातील एका गावात गावबंदीचा पहिला बॅनर लावण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी राज्यभरात गावोगावी राजकीय नेत्यांना प्रवेशबंदीचे बॅनर लावण्यात आले होते. हे बंदी सर्वच नेत्यांना सरसकट घालण्यात आली होती. परंतू, ओबीसी समाजाने ओबीसी नेत्यांना परवानगी असल्याचे म्हणत इतर समाजाच्या नेत्यांना गावबंदी केली आहे.
दोन्ही समाजांच्या आरक्षणाचे केंद्र असलेल्या जालना जिल्ह्यात आरक्षणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मनोज जरांगे यांनी ग्रामस्थांचा विरोध असला तरी अंतरवाली सराटीतूनच पुन्हा आंदोलन सुरु केले आहे. तर लक्ष्मण हाके यांनीही आंदोलनासाठी जालना जिल्हाच निवडला. ओबीसीतून आरक्षणासाठी जरांगे ठाम असून सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी राज्य सरकारला पुन्हा मुदत दिली आहे. तर हाके यांनी मराठा समाजाला काहीही केल्या ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून राज्य सरकारकडून शब्द घेतला आहे. या दोन्ही आरक्षणांच्या कात्रीत सरकारची मोठी कोंडी झाली आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक लागणार आहे. अशातच आता ओबीसी समाजाने नेत्यांना गाव बंदीला सुरुवात केल्याने खळबळ उडाली आहे. आजही गावागावात मराठा समाजाने नेत्यांना गावबंदी केल्याचे बॅनर झळकत आहेत. अशातच आता ओबीसी नेत्यांचेही बॅनर गावागावात लागण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाने सरसकट सर्वच नेत्यांना गावबंदी केली होती. ओबीसी समाजाने ओबीसी नेता वगळून इतर समाजाच्या नेत्यांना गावबंदी केली आहे. परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात हा बॅनर लागला आहे. ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, तसे झाल्यास मोठा अवमान करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. हाके यांनी हा निर्णय चुकीचा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.