डोळ्यासमोर पाणी तरी घागर उताणी; पाण्यासाठी कळभोडे, कोठारे ग्रामस्थांची दमछाक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 07:14 PM2022-04-07T19:14:16+5:302022-04-07T19:14:45+5:30

'थ्री फेज' विज नसल्याने पाणी योजनाही धुळखात.

village in kasara having water sources but did not get water especial story | डोळ्यासमोर पाणी तरी घागर उताणी; पाण्यासाठी कळभोडे, कोठारे ग्रामस्थांची दमछाक

डोळ्यासमोर पाणी तरी घागर उताणी; पाण्यासाठी कळभोडे, कोठारे ग्रामस्थांची दमछाक

googlenewsNext

शाम धुमाळ

कसारा : धरणाचा तालुका म्हटले की शहापूर तालुक्याचे नाव पुढे येते. अतिदुर्गम व संपूर्ण आदिवासी तालुका असलेला शहापूर तालुका सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेला तालुका या तालुक्यात अप्पर वैतरणा, तानसा, भातसासारखे महाकाय जलाशय (धरणे) आहेत व अजून 2 जलाशय नव्याने होत आहेत. या जलाशयाचे पाणी तालुक्यातील तहानलेल्या आदिवासी बांधवाना न मिळता थेट मुबई , ठाण्याला मिळतेय. परिणामी धरणांचा तालुका असलेला तालुका आज पाणी टंचाईने ग्रासला आहे.

शहापूर तालुक्यातील कोठारे, कळभोडे, कोथला, थड्याचापाडासह विहिगाव, माळ परिसरात  पाणी टंचाईने मार्च महिन्यापासूनच डोके वर काढले आहे. त्यातच थड्याचा पाडा या गावांत तर जानेवारी पासूनच पाणी टंचाई  डोके वर काढत आहे. शहापूर तालुक्यातील भातसा नदी पात्राच्या  माथ्यावर वसलेल्या थड्याचा पाडा या गावाला 3 दिशेने भातसा नदी पात्राने वेढलेले आहे. या गावांचे दुर्भीक्ष्य असे की 2 ते 3 किलोमीटर अंतरावर महाकाय पाणीसाठा लोकांना डोळ्याने दिसत आहे. पन् गावांत पाणी नाही. डबके आटलेले, विहिरी कोरड्या पडल्यात. 4 वर्षांपूर्वी पाणी योजना मंजूर झाली पण वीज पुरवठा कमी दाबाचा असल्याने ती पाणी योजना धुळखात पडली.

या गावात जानेवारी पासूनच पाणी टंचाई उधभवते परंतु शासकीय टँकर मार्च नंतर सुरु होत असल्याने स्थानिक माता भगिनीं व पुरुष मंडळी दरीत उतरत 2 ते 3 किमी चा पायी प्रवास करीत दरी चढउतार करीत पाणी आणतात. तर मार्च नंतर या गावांसाठी टँकर सुरु होतात गावातील विहिरीवर टँकर खाली होण्यासाठी आला की गावातील ग्रामस्थ विहिरीभोवती गराडा घालीत पाणी घेण्यासाठी गर्दी करतात . पाणी भरून आलेला टँकर काही मिनिटांतच रिकामा होतो व निघून जातो. म्हणजेच आलेला टँकर हा अपूर्ण पडत असतो. ग्रामस्थ पाण्याचा वापर काटकसरीने करतात, तसंच जनावरांच्या पाण्यासाठीची तरतूद देखील करतात.

आमदार दौलत दरोडा यांचे गाव असलेल्या कोठारे गावांत व पाड्यात देखील  पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. विहिरींनी तळ गाठल्याने लोकांना टँकरची वाट बघत बसावे लागत आहे. या गावाची स्तिथी सुद्धा अशीच आहे. गावाच्या दोन्ही दिशेस भातसाचे पाणी आहे व होऊ घातलेल्या मुमरी धरणाचा मार्गदेखील या गावाच्या वेशीवरुन जात आहे. परंतु  त्याचा उपयोगदेखील या गावाला होईल असे वाटत नाही. दरम्यान या दोन्ही गावा प्रमाणेच तालुक्यातील 50 पेक्षा अधिक गाव पाड्यात पाण्याचे दुर्भीक्ष जाणवत असून काही ठिकाणी सुरु झालेले टँकर देखील कमी पडत आहेत.

उब्रावणे गावकऱ्याचे सहा महिन्यापसून पाण्याचे  नियोजन
कसाऱ्यापासून 5 किलोमीटर अंतरावर डोंगर कपारीत वसलेल्या उब्रावणे गावातील लोक दिवाळी पासूनच पाण्याचे नियोजन करीत असतात. गावांत असलेल्या दोन विहिरी पावसाळ्यात भरलेल्या असतात. त्यातील एक विहीर ग्रामस्थ बंद करून ठेवतात. त्यावर आवरण घालीत एक विहीर बंद करून ठेवतात व एका विहीरीचे पाणी मार्च पर्यंत वापरतात. घरपट 4 ते 5 हांडे पाणी पिण्यासाठी वापरलं जातं, तर रोजच्या वापरासाठी  छोट्या छोट्या वाहत्या नाल्याचे पाणी आणतात. मार्च महिन्यात पाणी टँकर सुरु झाले की बंद केलेली विहीर गावकरी उघडतात व त्यातील पाणी वापरणे सुरु करतात. टँकरचे पाणी व विहिरीतील पाणी यांचे योग्य नियोजन करीत असल्याने ग्रामस्थाना पाण्याची झळ कमी प्रमाणात बसत असते.

पाणी टंचाई सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी अपयशी
दरम्यान शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई असो किंवा अपूर्ण व निकृष्ठ रस्ते यावर कारवाईसाठी म्हणा किंवा सकारात्मक रित्या प्रश्न सोडवून आदिवासी माता भगिनींची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी शहापूर तालुख्यातील लोकप्रतिनिधी अपयशी ठरत असल्याची चर्चा सध्या शहापूर तालुक्यात ऐकायला मिळत आहे.

पाणी योजने साठी थंड्याचापाडा येथे 3 फेज लाईन ची गरज असल्याने या गावांसाठी येत्या 15 दिवसात नवीन ट्रान्सफर बसवण्यात येईल व होणारी गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न करू.
अविनाश कटकवार
उपकार्यकारी अभियंता,शहापूर, म.रा.वि.वि.मंडळ.

थड्याचा पाडा व कोठारे या भागातील दौरा केला असता अनेक अडचणी,समस्या  समोर आल्या. असे असताना लोकप्रतिनिधी एसीची हवा खाण्यात व्यस्त आहेत. मात्र ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी  वीज वितरण व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याशी सकारात्मक बोलणी झाली असून शिवसेनेच्या माद्यमातून या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यात यश मिळेल.
पांडुरंग बरोरा, माजी आमदार

धरणाच्या बेटावर वसलेल्या शहापूर तालुक्यातील असंख्य गाव पाड्यातील ग्रामस्थ फेब्रुवारी नंतर  पाण्यासाठी  वणवन करीत असतात याचं धरणातील पाणी तालुक्यासाठी काही प्रमाणात आरक्षित केले तर टंचाई चे प्रमाण कमी होऊ शकते.
प्रकाश खोडका, स्थानिक 

Web Title: village in kasara having water sources but did not get water especial story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.