घटनाकारांचे गाव आजही उपेक्षितच!

By admin | Published: November 17, 2015 11:23 PM2015-11-17T23:23:21+5:302015-11-18T00:02:36+5:30

आंबडवे : संसद दत्तक ग्राम योजनेतून विकासाची अपेक्षा, साबळे यांच्यावर एकवटल्या आशा--मोठ्यांची छोटी गावं...

The village of the protesters still neglected! | घटनाकारांचे गाव आजही उपेक्षितच!

घटनाकारांचे गाव आजही उपेक्षितच!

Next

शिवाजी गोरे --दापोली भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, बहुजनांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव मंडणगड तालुक्यातील आंबडवे. स्वतंत्र भारताला ज्या महामानवाने घटना दिली, समता, समानता, बंधुभावाची प्रेरणा दिली, अशा महामानवाचे मूळ गाव शासन दरबारी दुर्लक्षित आहे. जागतिक कीर्तीचे बुद्धिमान विचारवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाला भेट देण्यासाठी जगभरातून अनेक अनुयायी या गावात येऊन नतमस्तक होतात. जागतिक कीर्तीचा युगपुरुष ज्या मातीने दिला, ज्यांच्या पदस्पर्शाने जी भूमी पावन झाली, त्या भूमीची ही मातीसुद्धा पवित्र समजून अनेक अनुयायी बाबासाहेबांच्या मूळ गावाला भेट देऊन या गावातील माती कपाळाला लावून आपण धन्य झालो, असे मानतात. ज्यांच्यामुळे आपल्याला माणूसपण मिळाले, जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले, ‘धन्य ती धरणी माता धन्य ते भीमराय’ म्हणत या मातीशी नतमस्तक होणारे त्यांचे अनुयायी बाबासाहेबांच्या गावाची दुर्दशा पाहून निराशही होतात. समतेचे पुजारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव मंडणगड शहरापासून अवघ्या १८ किलोमीटर अतंरावर आहे. परंतु, या गावाकडे जाण्यासाठी अरुंद व खड्डेमय नादुरुस्त रस्ते आहेत. दिशादर्शक फलकाचा अभाव आहे. गावाच्या जवळ जाईपर्यंत गाव दिसत नाही. गावात गेल्यावर पायाभूत सुविधांचा अभाव आहे, हे पहिल्याच टप्प्यात जाणवते. गावात पथदीप, गटारे, पिण्याचे मुबलक पाणी नाही, चार - चार दिवस वीज गायब असते, दूरध्वनी, भ्रमणध्वनी यांची पुरेशी सुविधा नाही. बँक, एटीएम, प्राथमिक आरोग्य केंद्र, सुलभ शौचालय अशा प्राथमिक सुविधाही या गावात नाहीत. या थोर पुरुषाला ‘भारतरत्न’सारखा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करण्यात आला. मात्र, ज्या मातीशी त्यांची नाळ जुळली होती, ज्या मातीने त्यांना प्रेरणा दिली, ज्या मातीत त्याचे बालपण गेले, ज्या कुटुंबाने शेवटच्या श्वासापर्यंत गावाशी ऋणानुबंध जपले, त्या गावाचाच शासनाला विसर पडला आहे. आपल्या कर्तृत्त्वाने मोठ्या झालेल्या माणसांची मूळ गावे कशी असतील, त्यांचे घर कसे असेल, त्या गावातील माणसे कशी आहेत, त्यांचे दैनंदिन जीवनमान कसे आहे, याबद्दल देश-विदेशातील लोकांना प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे ते परत परत या गावाला भेट देण्यासाठी येत असतात. परंतु, कर्तृत्त्वाने मोठ्या झालेल्या माणसांची गावे अजूनही छोटीच असल्याचे पाहून त्यांना दु:ख होत आहे. बाबासाहेबांच्या ‘आंबडवे’ या मूळ गावात त्यांच्या घराचे स्मारकात रुपांतर झाले आहे. या स्मारकाला भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो अनुयायी येत असतात. परंतु, येथे आल्यावर त्यांची प्रचंड गैरसोय होते. राहण्याची व्यवस्था नाही, हॉटेल्स नाहीत, सुलभ शौचालय नाही. त्यामुळे निराश होऊन आल्या पावली मंडणगड गाठावे लागते. या गावात येण्या - जाण्यासाठी दोनच बस आहेत, त्यामुळे अनेक अडचणी येतात. आयुष्यभर मानवाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या या महामानवाच्या गावाची दुरवस्था पाहून बाबासाहेबांच्या अनुयायांनी नळपाणी योजना, पाण्याची टाकी, अशी छोटी छोटी विकासकामे करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, शासनाकडून मात्र महामानवाच्या गावाची फारशी दखल घेतलेली दिसत नाही. त्याचमुळे आजही या गावात अनेक सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. बाबासाहेबांचे वडील निवृत्त झाल्यावर प्रथम आंबडवे, त्यानंतर दापोली येथे वास्तव्यास होते. नोकरीनिमित्त ते सातारा, मुंबई फिरत राहिले. परंतु, त्यांनी आपल्या गावाशी नाळ कधीही तुटू दिली नाही. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत व गणपती सणाला ते बाबासाहेबांना घेऊन मूळ गावाला येत असत. शिक्षणामुळे मोठेपणी त्यांना मूळ गावी येता आले नाही. बाबासाहेबांच्या समाजकार्याचा आवाका संपूर्ण देशभर पसरल्यामुळे त्यांना आपल्या मूळ गावाकडे फारसे लक्ष देता आले नाही. त्याकाळी बाबासाहेब या भागात न आल्यामुळे त्या भागाचा विकास झाला नाही. पर्यटन स्थळ म्हणून बाबासाहेबांचे मूळगाव जगाच्या नकाशावर येऊ पाहात आहे. परंतु, या गावाचा विकास होणे गरजेचे आहे, यासाठी गावाला विशेष दर्जा देऊन विकास व्हावा, अशी अपेक्षा केला जात आहे. किमान या गावात येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहेत. गावात आरोग्य, पाणी, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांचा ओघ नक्कीच वाढले. अस्पृश्यता निवारणासाठी आयुष्य भारतीय दलितांना सत्व व स्वत्त्वाची जाणीव करुन आत्मभान देणारे महान व्यक्तीमत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर! अस्पृश्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. तत्कालीन समाज अस्पृश्यतेची रुढी पाळून माणूसकीला कलंक लावत होता. समाजातील अनिष्ट रुढींवर प्रहार करून अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी लढा सुरु केला. मानवजात समान आहे, कोणीही उच्च - नीच नाही, देवाने भेदभाव केला नाही, तर जाती - जातीत समाजाची विभागणी करुन अस्पृश्यता निर्माण करणे चुकीचे आहे. दलितांवरील अन्यायाविरोधात बाबासाहेबांनी हत्यार उपसले. दलित अत्याचाराविरोधात ‘मूकनायक’, ‘जनता’, ‘समता’, ‘बहिष्कृत भारत’ या वृत्तपत्रांमधून प्रबोधनात्मक लेखन करुन दलित समाजात जागृती निर्माण केली. जागृतीसाठी उपलब्ध असलेल्या प्रत्येक पर्यायाचा वापर त्यांनी केला आणि समाज शिक्षित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. १९९0 साली भारतरत्न किताब बाबासाहेब मुत्सद्दी राजकारणी, समाजसुधारक, द्रष्टे विचारवंत होते. पिढ्यानपिढ्या गावकुसाबाहेर खितपत पडलेल्या दलित बांधवांना माणूस म्हणून सन्मानाने वागवले पाहिजे. यासाठी आपली उभी हयात त्यांनी खर्ची घातली. हिंदू धर्मात दलितांना सन्मानाने जगता येत नसल्याने त्यांनी गौतम बुद्धांच्या ‘बुद्ध’ धर्माची दीक्षा घेतली. ‘बुद्ध’ धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या कार्यात त्यांची पत्नी माता रमाई यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या महामानवाचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या कार्याची दखल म्हणून भारत सरकारतर्फे ‘भारतरत्न’ या सर्वोच्च किताबाने १९९० साली मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. चवदार तळ्याचा सत्याग्रह महाड येथील चवदार तळ्याचे पाणी इतरांप्रमाणे अस्पृश्यांनाही भरता यावे, यासाठी हजारो अनुयायांसह १९२७ला सत्याग्रह केला. या तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून त्यांनी समाजात फार मोठी क्रांती केली. या आंदोलनाची दखल भारतभर घेतली गेली. अमर साबळे यांनी घेतले दत्तक केंद्र सरकारच्या संसद दत्तक ग्राम योजनेत हे गाव राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी दत्तक घेतले आहे. त्यामुळे या गावाच्या विकासाची आशा निर्माण झाली आहे. बाबासाहेबांच्या १२५व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवले जात असताना हे गाव जागतिक कीर्तीचे, जागतिक दर्जाचे बनवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी याआधीच जाहीर केले आहे. दत्तक ग्राम योजनेच्या निकषात हे गाव बसत नव्हते. मात्र, खासदार साबळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करून विशेष बाब म्हणून हे गाव दत्तक घेण्याबाबतचा मनोदय व्यक्त केला. त्यानुसार देशातील काही निवडक व्यक्तींच्या मूळ गावांचा या योजनेत समावेश झाला. आता या गावांत अनेक योजना राबवल्या जाणे अपेक्षित आहे. मध्यप्रदेशात जन्म, साताऱ्यात शिक्षण दलितांवर पिढ्यानपिढ्या होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढून त्यांनी माणसाला माणूसपण मिळवून दिले. समाज सर्वार्थाने स्वतंत्र व्हावा म्हणून झटणारे एक थोर भारतीय पुढारी डॉ. भीमराव रामजी ऊर्फ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील ‘महू’ या गावी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाबासाहेबांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील ‘आंबडवे’ हे आहे. त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा दापोली येथे झाला, त्यानंतर सातारा येथे प्राथमिक शिक्षण झाले. त्यांचे विद्यार्थीजीवन म्हणजे अखंड ज्ञानयज्ञच! प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे शिक्षण झाले. रस्त्यावरील दिव्याखाली बसून बाबासाहेब अभ्यास करणाऱ्या बाबासाहेबांनी उच्च शिक्षणापर्यंत मजल मारली. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व कायदा हे त्यांच्या अभ्यासाचे विशेष विषय होते. काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी अस्पृश्यांना देवदर्शन घेता यावे, यासाठी १९३० साली अनुयायांसह नाशिकला काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. तसेच विविध संस्था स्थापन करून अस्पृश्यांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविला. त्यामुळेच अस्पृश्यांना मंदिरात जाणे शक्य झाले आहे. मध्यप्रदेशात जन्म, साताऱ्यात शिक्षण दलितांवर पिढ्यानपिढ्या होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढून त्यांनी माणसाला माणूसपण मिळवून दिले. समाज सर्वार्थाने स्वतंत्र व्हावा म्हणून झटणारे एक थोर भारतीय पुढारी डॉ. भीमराव रामजी ऊर्फ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील ‘महू’ या गावी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाबासाहेबांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील ‘आंबडवे’ हे आहे. त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा दापोली येथे झाला, त्यानंतर सातारा येथे प्राथमिक शिक्षण झाले. त्यांचे विद्यार्थीजीवन म्हणजे अखंड ज्ञानयज्ञच! प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे शिक्षण झाले. रस्त्यावरील दिव्याखाली बसून बाबासाहेब अभ्यास करणाऱ्या बाबासाहेबांनी उच्च शिक्षणापर्यंत मजल मारली. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व कायदा हे त्यांच्या अभ्यासाचे विशेष विषय होते.

Web Title: The village of the protesters still neglected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.