ग्रामीण विद्यार्थ्यांनी शोधला वीजचोरीवर उपाय
By Admin | Published: May 4, 2016 09:52 PM2016-05-04T21:52:40+5:302016-05-04T21:52:40+5:30
वीज चोरीची समस्या महावितरणपुढे डोकेदुखी ठरली आहे. त्याचा परिणाम केवळ महावितरणच्या महसुलावरच होत नाही, तर प्रामाणिक ग्राहकांनाही भुर्दंड सोसावा लागतो आहे
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 4- वीज चोरीची समस्या महावितरणपुढे डोकेदुखी ठरली आहे. त्याचा परिणाम केवळ महावितरणच्या महसुलावरच होत नाही, तर प्रामाणिक ग्राहकांनाही भुर्दंड सोसावा लागतो आहे. महावितरणला आजपर्यत ही समस्या सोडविता आली नाही. महावितरणची ही डोकेदुखी संपविण्याचे तंत्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शोधले आहे. त्यांनी तयार केलेले स्मार्ट मीटर वीजचोरींवर अंकुश लावू शकतील असा दावा या विद्यार्थ्यांचा आहे.
प्रफुल्ल पाटील, अक्षय आटे, प्रशांत कळंबे व मुजीब खान हे उमरेड तालुक्यातील पॉलिटेक्निकचे विद्यार्थी. घरच्या परिस्थितीशी दोन हात करीत त्यांची शिक्षणाची धडपड सुरू आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक सत्रात वीज चोरी, वीज सुरक्षा आणि वीज कर्मचाºयांचा त्रास वाचविण्यासाठी ‘अॅडव्हान्स इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन सिस्टम’ नावाने प्रोजेक्ट तयार केला आहे. त्यांच्या प्रोजेक्टला राष्ट्रीय स्तरावर चार वेळा प्रथक क्रमांक मिळाला आहे.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत असल्याचे या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. हे विद्यार्थी राहत असलेल्या ग्रामीण भागातील कारखाने चोरीच्या विजेवर चालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वाढत्या लोकसंख्येबरोबर वीजचोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. वीज चोरावंर कारवाई करण्यासाठी महावितरणजवळ पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे महावितरणला फटका बसतो आहे.
वीज चोरीतून बसलेला भुर्दंड महावितरण वीज दरवाढ करून ग्राहकांच्या खिशातून वसूल करीत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता या विद्यार्थ्यांनी आकोडा टाकल्यानंतरही चोरट्यांना वीज वापर करता येणार नाही, अशा आधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर तयार केले. हे वीज मीटर सेट-टॉप बॉक्स सारखे काम करणार आहे. म्हणजे ज्यांच्या घरी मीटर असेल त्यांनाच वीज मिळले. विद्यार्थ्यांच्या मते विजेमध्ये व्होल्टेज, करंट आणि फ्रिक्वेन्सी असे तीन घटक असतात. या तीनही घटकाशिवाय विजेचा वापर करता येत नाही. विद्यार्थ्यांनी तयार केलेले स्मार्ट मीटर हे फ्रिक्वेन्सी कन्व्हर्ट करणार आहे. यात त्यांनी अॅसिलेटर सर्किटचा वापर केला आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी मीटर असेल त्यांनाच वीज वापरता येणार आहे. चोरट्यांनी आकोडा टाकून वीजचोरीचा प्रयत्न केल्यास त्यांना व्होल्टेज मिळेल, करंट येईल, फ्रिक्वेन्सी नसल्यामुळे विजेची उपकरणे काम करणार नाही.