होळ शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे
By admin | Published: August 4, 2016 01:08 AM2016-08-04T01:08:28+5:302016-08-04T01:08:28+5:30
दीड महिन्यापासून वारंवार मागणी करूनही जिल्हा परिषद शाळेला शिक्षक उपलब्ध करून दिला जात नाही
वडगाव निंबाळकर : दीड महिन्यापासून वारंवार मागणी करूनही जिल्हा परिषद शाळेला शिक्षक उपलब्ध करून दिला जात नाही, या कारणास्तव होळ (ता. बारामती) येथील संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी शाळेला टाळे ठोकले. दरम्यान, केंद्रप्रमुखांनी वरिष्ठांशी चर्चा करून पर्यायी शिक्षक उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
बारामती तालुक्यातील होळ येथील असलेल्या जिल्हा परिषद शाळेचे पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. या ठिकाणी ३२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. द्विशिक्षकी असलेल्या या शाळेत एका शिक्षकाच्या बदलीनंतर दुसरा शिक्षकच देण्यात आलेला नाही. ३२ पट असलेली ही शाळा अवघ्या एकाच शिक्षकाला सांभाळावी लागत आहे. गतवर्षी शाळेत दोन शिक्षक कार्यरत होते.य् त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, वेळोवेळी तोंडी मागणी करूनही येथे शिक्षकांची नेमणूक करण्यात आली नव्हती. याबाबत शाळेस त्वरित दुसरा शिक्षक मिळावा, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह पालकांनी लेखी निवेदनाद्वारे पंचायत समितीकडे केली होती.
या वेळी संतोष भंडलकर, रघुनाथ धुमाळ, सुरेश होळकर, दीपक वाघ, संतोष भिसे, संजय होळकर, महेंद्र भंडलकर, कल्पना चौधरी, सारिका भोसले, नवनाथ होळकर, विजय वाघमारे, नामदेव भिसे आदींसह प्रेरणा यूथ फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. शाळेला टाळे ठोकल्यानंतर केंद्रप्रमुख संजय गायकवाड यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा केली.