बुलेट ट्रेनकरिता जमीन न देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
By admin | Published: June 9, 2017 03:04 AM2017-06-09T03:04:07+5:302017-06-09T03:04:07+5:30
(बुलेट ट्रेन) रेल्वेच्या प्रकल्पा करीता शेत जमिनी न देण्याचा निर्धार मान ग्रामस्थांनी करुन तसा ठराव विशेष ग्रामसभेत सर्वानुमते मंजूरही करण्यांत आला
लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : मुंबई अहमदाबाद दरम्यान हाय स्पीड (बुलेट ट्रेन) रेल्वेच्या प्रकल्पा करीता शेत जमिनी न देण्याचा निर्धार मान ग्रामस्थांनी करुन तसा ठराव विशेष ग्रामसभेत सर्वानुमते मंजूरही करण्यांत आला आहे. हा ठराव व निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. आम्हाला उध्वस्थ करणारा हा प्रकल्प नको, अशी भावना त्यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.
प्रस्तावित रेल्वे मार्ग पालघर तालुक्यातील कल्हाले, मान, बेटेगाव, पडघे या गावांतून जाणार असून त्या त्याचे फायनल लोकेशन, सर्व्हे आणि जिओटेक्निकल इनव्हेस्टीगेशन सर्व्हे लवकरच करावयाचे असल्याची माहिती पालघरचे तहसीलदार आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ५ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयातील बैठकीत दिली. मात्र या प्रकल्पासंदर्भात मान ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यांत आली होती त्या सभेत या प्रकल्पाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शवून ग्रा. प. कार्यक्षेत्रातून प्रकल्प उभारू द्यायचा तर नाहीच परंतु आमच्या मालकीच्या जमिनीही आम्ही प्रकल्पाकरीता देणार नाही असा निर्धार व्यक्त केला असे, मान ग्रामपंचायतीचे सरपंच मोरेश्वर दौडा व उप सरपंच अॅड राहुल पाटील यांनी सांगितले.