स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी बोंबळी गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार, एकाचेही मतदान नाही; कर्नाटकात जाण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 03:39 PM2022-12-18T15:39:07+5:302022-12-18T15:41:12+5:30
देवणी तालुक्यातील बोंबळी (खु.) व बोंबळी (बु.) साठी ग्रुप ग्रामपंचायत आहे.
महेश कणजे/ वलांडी (जि. लातूर)
वलांडी : देवणी तालुक्यातील बोंबळी (खु.) व बोंबळी (बु.) साठी ग्रुप ग्रामपंचायत आहे. बोंबळी (बु.) येथील ग्रामस्थांनी आमच्या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करावी, अशी मागणी करीत रविवारी ग्रामपंचायतीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. दुपारी ३ वा. पर्यंत बोंबळी (बु.) मधील एकाही मतदाराने मतदानाचा हक्क बजावला नाही.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर बोंबळी (खु.) व बोंबळी (बु.) ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. दीडशे उंबरठे असलेल्या बोंबळी बु. मध्ये जवळपास १२५० लोकसंख्या असून ७५० मतदार आहेत. या ग्रुप ग्रामपंचायतीची सदस्य संख्या एकूण ९ असून त्यात बोंबळी बु. मध्ये तीन सदस्य संख्या आहे.
रविवारी सकाळपासून बोंबळी खु. येथे मतदानास सुरुवात झाली. परंतु, बोंबळी बु. मधील नागरिकांनी आमच्या गावाची सदस्य संख्या कमी असल्याने व सरपंच होत नसल्याने विकास झाला नाही. मुलभूत सुविधांचाही अभाव आहे. त्यामुळे आमच्या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करावी, अशी मागणी करीत मतदानावर बहिष्कार टाकला. दुपारी ३ वा. पर्यंत गावातील एकही मतदार मतदान केंद्राकडे गेला नाही.
एकूण ५१२ मतदार...
बोंबळी बु. गावात एकूण ५१२ मतदार असून एकानेही मतदान केले नाही, असे मतदान केंद्राध्यक्ष सी.एस. गुरुस्थळे यांनी सांगितले. तसेच या गावातील उर्वरित १४५ जणांचे मतदान बोंबळी खु. मध्ये असून तिथेही येथील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही.
निकषात बसत नसेल तर कर्नाटकात जाऊ...
स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, तो प्रलंबित आहे. शासनाच्या निकषात आमचे गाव बसत नसेल तर आम्ही कर्नाटकात जाऊ असा पावित्रा घेतल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले.
तहसीलदारांच्या बैठकीत मांडल्या व्यथा...
गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकू नये म्हणून तहसीलदारांनी शुक्रवारी ग्रामस्थांची बैठक घेतली. तेव्हा गावकऱ्यांनी गावातील समस्या मांडल्या. स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात येणार नाही, तोपर्यंत आमचा सर्व निवडणुकांवर बहिष्कार कायम राहणार असेल, असे ग्रामस्थ अभंग सूर्यवंशी, सिद्धलिंग कन्नडे, तानाजी कारभारी, शिवाजी हुरुसनाळे, ज्ञानेश्वर शिंदे, देविदास बोंबळीकर, भरत गायकवाड, शामराव शिंदे, रामदास कांबळे, शिवाजी लांडगे, चंद्रकांत लांडगे, शिवानंद कन्नाडे, भगवान गिरी, काशिनाथ गायकवाड, नरसिंग लांडगे, शंकर कांबळे, उद्धव कांबळे, शिवाजी लांडगे यांनी सांगितले.
नागरिकांनी मतदान करावे...
नागरिकांची समजूत काढण्यासाठी रविवारी सकाळी तहसीलदार सुरेश घोळवे हे बोंबळी बु. गावात दाखल झाले होते. त्यांनी मतदारांच्या भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. तेव्हा ग्रामस्थांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी कायम ठेवली. त्यामुळे घोळवे यांनी ही मागणी पूर्ण करण्याचा माझ्या अखत्यारितील विषय नाही. वरिष्ठांना कळविण्यात येईल असे सांगितले.
९ सदस्यांची ग्रामपंचायत...
ही ग्रुप ग्रामपंचायत ९ सदस्यांची आहे. बोंबळी खु. मध्ये सहा सदस्यांच्या निवडीसाठी ११०५ मतदार आहेत. बोंबळी बु. मध्ये तीन सदस्य असून ६५७ मतदार आहेत.