शहरांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार
By admin | Published: January 22, 2015 02:06 AM2015-01-22T02:06:50+5:302015-01-22T02:06:50+5:30
राज्यातील शहरी शाळांमधील विद्यार्थ्यांचे मराठी आणि गणित विषयांमधील ज्ञान ग्रामीण विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
पुणे : ग्रामीण भागातील शाळांपेक्षा शहरी भागातील शाळांची गुणवत्ता अधिक चांगली असते, असा गवगवा केला जात असला तरी राज्यातील शहरी शाळांमधील विद्यार्थ्यांचे मराठी आणि गणित विषयांमधील ज्ञान ग्रामीण विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील एकूण २ हजार २९३७ शाळांमधील पाचवीच्या विद्यार्थ्यांचे मराठी व गणित विषयातील ज्ञानाचे मूल्यमापन करण्यात आले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ८१ शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे ४४ वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात आले. हे प्रश्न श्रवण, वाचन, शब्दसंपत्ती, कार्यात्मक व्याकरण, लेखन यावर आधारित होते. तर गणित विषयातील ५० वस्तुनिष्ठ प्रश्न हे संख्यात्मक, अपूर्णांक, संख्यावरील क्रिया, अपूर्णांकावलील क्रिया, मापन, व्यवहारिक गणित, भूमितीवर आधरित होते.
या प्रश्नांना विद्यार्थ्यांना दिलेल्या उत्तरांच्या आधारावरून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातही मराठी विषयामध्ये ग्रामीण भागातील मुलांपेक्षा मुलीच अधिक हुशार असल्याचे निदर्शनास आले आहे.
यंदा प्रथमच विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेची प्रमाणीत चाचणी एससीईआरटीतर्फे करण्यात आली. या अहवालाची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
च्मराठीच्या चाचणीत २१ ते ५० गुण मिळविणाऱ्यांची टक्केवारी ७१.५७ टक्के आहे. तर गणिताच्या चाचणीमध्ये २१ ते ५० गुण मिळविणाऱ्यांची टक्केवारी ६३.७४ टक्के आहे. ० ते २० गुण मिळविणाऱ्या विद्यार्थांची संख्या २८.४२ आहे.
च्एससीईआरटीने जातीनिहाय सर्वेक्षण केले असून त्यात अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय वर्ग आणि खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांची सुद्धा वेगळी नोंद या अहवालात आहे. त्यात भटक्या जमातीमधील विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालकांकडून घरी अभ्यासात मदत मिळत असलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी ७३.३२ टक्के आहे.