गावक-यांनी वाचवला चोरट्यांचा जीव
By admin | Published: September 6, 2016 09:36 PM2016-09-06T21:36:45+5:302016-09-06T21:36:45+5:30
मध्यरात्री विहिरीत पडलेल्या या चोरट्यांना चार तास मृत्यूशी झुंज द्यावी लागली.
विठ्ठल भिसे/ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 6 - पाठलाग करणाऱ्या ग्रामस्थांपासून बचावासाठी धूम ठोकलेले चोरटे अचानक ७० फूट खोल विहिरीत पडल्याची घटना पाथरी तालुक्यातील कासापुरी येथे घडली. मध्यरात्री विहिरीत पडलेल्या या चोरट्यांना चार तास मृत्यूशी झुंज द्यावी लागली. अखेर ग्रामस्थ आणि पोलिसांच्याच मदतीने चारही चोरट्यांना विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. ६ सप्टेंबर रोजी पहाटे ही घटना घडली.
पाथरी तालुक्यातील कासापुरी फाट्याजवळ बीएसएनएल कंपनीचे टॉवर आहे. या टॉवरमधील बॅटऱ्या चोरण्यासाठी काही चोरटे ६ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास मोटारसायकल आणि आॅटोरिक्षा घेऊन घटनास्थळी आले होते. टॉवरवर काम करणारे वॉचमन लक्ष्मण नानाभाऊ भाग्यवंत यांना टॉवरमधील रुममध्ये आवाज आल्याने ते खडबडून जागे झाले. तेव्हा चोरटे टॉवरच्या बॅटऱ्या काढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भाग्यवंत यांनी सावधगिरी बाळगत कासापुरी गावातील काही ग्रामस्थांना फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर गावातून सहा मोटारसायकलवर ८ ते १० ग्रामस्थ घटनास्थळाकडे निघाले.
तीन मोटारसायकल कॅनलच्या बाजूने तर तीन मुख्य रस्त्याने येत असल्याचे पाहून चोरट्यांनी घटनास्थळापासून पळ काढला. ग्रामस्थांनी मोटारसायकलवर चोरट्यांचा पाठलाग केला़ चोरटे सैरावैरा पळत होते़ काही अंतरावरच कठडे नसलेली विहीर होती़ ही विहीर चोरट्यांच्या लक्षात आली नाही आणि चारही चोरटे ७० फूट खोल विहिरीत कोसळले. दरम्यान, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नवघरे यांनी ही माहिती पोलिसांना दिली़ पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत शंभरहून अधिक ग्रामस्थ एकत्र आले होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक जी़ एच़ लेंगुळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जी़ आऱ कालापाड, पोलिस नायक यु़एल़ माने, पोकाँ शिंदे, नाईक घटनास्थळी दाखल झाले.
चार चोरटे आले विहिरीबाहेर...
ग्रामस्थांच्या मदतीने चारही चोरट्यांना विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. अमजद खान मजीद खान पठाण (मानवत), शेख सोहेल शेख फरीद (परभणी), शेख मोबीन शेख शकील (परभणी) आणि सय्यद समंदर सय्यद सिकंदर अशी चोरट्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भितीने तीन ते चार तास विहिरीत...
तब्बल तीन ते चार तास विहिरीतील पाण्यात जीव मुठीत घेऊन राहिलेले चोरटे ग्रामस्थांच्या भितीने बाहेर येत नव्हते़ मात्र पोलिस आले आहेत असे सांगितल्यानंतर चोरटे विहिरीत सोडलेल्या दोरीला पकडून वर आले़ या चोरट्यांनी १८ बॅटऱ्या काढून आणल्या होत्या.