ग्रामस्थांनी जीव धोक्यात रेल्वेखाली जाण्यापासून वाचवले विवाहितेला
By admin | Published: March 4, 2017 10:11 PM2017-03-04T22:11:56+5:302017-03-04T22:11:56+5:30
रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न करणा-या विवाहितेला ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून वाचवले. क-हाड तालुक्यातील शेरेस्टेशन येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली.
Next
ऑनलाईन लोकमत
कराड, दि. 4 - रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न करणा-या विवाहितेला ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून वाचवले. क-हाड तालुक्यातील शेरेस्टेशन येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली. पोलिसांनी संबंधित महिलेसह तिच्या कुटुंबीयांना समज देऊन महिलेला नातेवाइकांच्या ताब्यात दिले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शेरे परिसरातील एका कुटुंबात पती-पत्नीमध्ये शनिवारी दुपारी वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर विवाहिता घरात कोणाला काही न सांगता घराबाहेर पडली. घरातून बाहेर पडल्यानंतर ती थेट शेरेस्टेशन येथील रेल्वे रुळावर पोहोचली.
आत्महत्येचा विचार करीत ती रेल्वे रुळावरून चालत होती. याच दरम्यान समोरून आलेल्या रेल्वेचा भोंगाही ऐकू आला. त्यामुळे नजीकच्या शेतात काम करणा-या ग्रामस्थांनी रुळाकडे पाहिले. एक महिला रुळावरून चालत असल्याचे व समोरून रेल्वे येत असल्याचे पाहिल्यानंतर ग्रामस्थांच्या पायखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीने रुळाकडे धाव घेतली. रेल्वे नजीक येत असतानाच काही ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून संबंधित महिलेला रुळावरून बाजूला खेचले. त्यानंतर भरधाव रेल्वे न थांबता मार्गस्थ झाली.
या प्रकारामुळे अगोदरच घाबरलेली महिला काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हती. अखेर ग्रामस्थांनी याबाबतची माहिती तालुका पोलिसांना दिली. माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने शेरेस्टेशन येथे पोहोचले. त्यांनी संबंधित महिलेला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. तिच्याकडे या कृत्याबाबत विचारणा केली असता ‘पतीशी झालेल्या भांडणाच्या कारणावरून मी आत्महत्या करणार होते,’ असे तिने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी संबंधित महिलेच्या पतीसह इतर नातेवाइकांना पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन त्यांना घटनेची माहिती दिली. तसेच कौटुंबिक वाद न करण्याबाबत समजही दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला समज देऊन नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे माहिती पोलिसांनी दिली.