जत तालुक्यातील गावे टंचाईग्रस्त

By Admin | Published: April 25, 2016 04:37 AM2016-04-25T04:37:24+5:302016-04-25T04:37:24+5:30

तहानलेल्या लातूरला पाणी देत ‘जलदूता’चे काम करणाऱ्या सांगली-मिरजकरांचे सर्वत्र कौतुक होत असले तरी, याच जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेली असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.

Villages in Jat taluka scarcity-hit | जत तालुक्यातील गावे टंचाईग्रस्त

जत तालुक्यातील गावे टंचाईग्रस्त

googlenewsNext

सांगली : तहानलेल्या लातूरला पाणी देत ‘जलदूता’चे काम करणाऱ्या सांगली-मिरजकरांचे सर्वत्र कौतुक होत असले तरी, याच जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेली असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. जत पूर्व भागातील टंचाईग्रस्त परिसराला कर्नाटकच्या ‘हिरेपडसलगी’ योजनेतून पाणी मिळण्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाल्याने, आता या गावांना टॅँकरच्या भरवशावरच राहावे लागणार आहे.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्र व कर्नाटकच्या पाण्याच्या देव-घेवीच्या चर्चेतून कर्नाटकला देण्यात येणाऱ्या
१ टीएमसी पाण्याच्या बदल्यात हिरेपडसलगी योजनेतून जत तालुक्यासाठी १ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कृष्णा नदी कोरडी पडल्याने सध्या हिरेपडसलगी योजना कार्यान्वित नाही. परिणामी, कर्नाटक पाटबंधारे विभागाने पाणी देण्यास असमर्थता दर्शवली आहे. याबदल्यात नारायणपूर योजनेतून अक्कलकोटसाठी पाणी मिळणार आहे. राज्यातील एका टंचाईग्रस्त भागाला पाणी मिळणार असले तरी, जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जत तालुक्यातील जलस्रोत आटले आहेत. १२३ गावे आणि वाड्या-वस्त्यांमुळे भौगोलिकदृष्ट्या भलामोठा असलेला जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळी आहे. सध्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा लाभ जत तालुक्यातील पश्चिम भागातील केवळ ११ गावांना होत आहे. या भागात असणारे १३ तलाव ‘म्हैसाळ’च्या पाण्याने भरून घेण्याची कार्यवाही सुरू असली तरी, पूर्व भागातील गावांना मात्र याचा फारसा लाभ होणार नाही.
जत तालुक्यातील पाणी प्रश्न गंभीर बनला असतानाच निसर्ग आणि प्रशासनाच्या अजब फेऱ्यात जत तालुक्यातील जनता अडकली आहे. तालुक्यातील तलाव कोरडे पडत असतानाच, आता कूपनलिका खोदण्यावरही प्रशासनाने निर्बंध लादले आहेत.
मुळात राज्यातील पाणीटंचाई असलेल्या भागाला पाणी देण्यात आपण आघाडी घेतली, ही सकारात्मक बाब असली तरी, जत तालुक्यातील टंचाई मिटविण्यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे होते. तालुक्यातील अपूर्ण योजनांसाठी १५० कोटींची मागणी केली असताना, केवळ २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ही या भागातील नागरिकांची क्रूर चेष्टा आहे.
- सुनील पोतदार, अध्यक्ष, तालुका पाणी संघर्ष समिती

Web Title: Villages in Jat taluka scarcity-hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.