विनय पवार, सारंग अकोळकर फरार घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 01:03 AM2017-08-06T01:03:51+5:302017-08-06T01:03:55+5:30
ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात संशयित फरार सनातन संस्थेचे साधक विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. कºहाड, जि. सातारा) व सारंग दिलीप अकोळकर
- लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात संशयित फरार सनातन संस्थेचे साधक विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. कºहाड, जि. सातारा) व सारंग दिलीप अकोळकर (रा. चिंतामणी अपार्टमेंट, पुणे) या दोघांना सत्र न्यायालयाने शनिवारी फरार घोषित केले. दरम्यान, समीर गायकवाड याला न्यायालयीन कामकाजासाठी मुंबईला जाण्यासाठी मंजुरी देण्यात आली.
पानसरे हत्येप्रकरणी शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर सुनावणी झाली. पवार व अकोळकर यांना अजामीनपात्र वॉरंट लागू केले आहे. ते पोलिसांपासून अस्तित्व लपवित आहेत. अटक टाळण्यासाठी ते फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा कसोशीने शोध घेत आहेत. या दोघांना फरार घोषित करावे अशी लेखी विनंती सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी केली. ती न्यायाधीश बिले यांनी मान्य केली. हे दोघे पोलिसांत हजर न झाल्यास त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात यावी, अशीही विनंती सरकार पक्षातर्फे करण्यात आली. त्यानंतर समीर गायकवाड हा जामिनावर बाहेर आहे. त्याचा जामीन रद्द करावा, यासाठी पोलिसांनी याचिका दाखल केली आहे. त्यासंबंधी तो १४ ते २६ आॅगस्टपर्यंत मुंबईला जाणार आहे. या कालावधीत येणाºया रविवारी (दि. २०) तो दादर पोलीस ठाण्यात हजेरी देईल, अशी विनंती अॅड. समीर पटवर्धन यांनी केली. त्यावर अॅड. राणे यांनी दादर पोलीस ठाण्यातील हजेरी रेकॉर्ड व मुंबईत तो कुठे राहणार याची संपूर्ण माहिती न्यायालयास सादर करावी, अशी मागणी केली. न्यायाधीश बिले यांनी समीरला मुंबईला जाण्यास मंजुरी दिली.
पवार व अकोळकर (कुलकर्णी) यांचा कोल्हापूर गुन्ह्यातील पिस्तूल व मोटारसायकल गायब करण्यामागे हात आहे. पानसरे यांच्या हत्येमध्ये या दोघांसह समीर गायकवाड व डॉ. वीरेंद्र तावडे यांचा मुख्य सहभाग आहे.