Vinayak Mete Accident, Death: मेटेंचा रात्री सव्वादोनला मेसेज, 'सकाळी बोलतो'! देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 09:09 AM2022-08-14T09:09:24+5:302022-08-14T09:10:23+5:30
विनायक मेटे यांच्या निधनानंतर राज्यातील महत्वाच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
विनायक मेटेंच्या अपघाताचे वृत्त समजले आणि माझाही विश्वास बसत नव्हता, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मेटे यांच्या निधनानंतर राज्यातील महत्वाच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अनेक आंदोलने मेटे यांनी मराठा समाजासाठी केली. गेल्याच आठवड्यात ते भेटले होते. शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी त्यांची तळमळ होती. तुम्ही दोघेही आहात, आता आमचा प्रश्न मार्गी लावा. त्यामुळे आज बैठक बोलावली होती. मराठा समाजासाठीच्या बैठकीला येत असताना त्यांचे निधन झाले. शासन नेहमी त्यांच्या विचारांच्या सोबत असेल. त्यांचा अपघात कसा झाला त्याची चौकशी होईल
मेटे यांचा अपघात झाल्याचे कळले, परंतू परिस्थिती लक्षात येत नव्हती. इथे आल्यावर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समजले. त्यांचा अपघात कसा झाला याची चौकशी होईल, तसे निर्देश दिले आहेत. मेटे यांचा मराठा आरक्षणावर मोठा अभ्यास होता. मेटेंचा रात्री सव्वा दोनला मेसेज आलेला, मी येतोय. तुमचा विमानात असल्याने फोन लागला नाही. सकाळी बोलतो. तो मेसेज मी सकाळी वाचला. अपरिमित क्षती. अजून त्यांच्या परिवारातील लोक पोहोचायचे आहेत. कार्यकर्त्यांना अंतिम दर्शन घेण्याचे नियोजन आम्ही करतोय.
विनायक मेटे राजकारणी कमी, सामाजिक कार्यकर्ते जास्त होते - पवार
मराठा समाजासाठी मेटे यांचं काम मोठं, मेटे हे राजकारणी कमी आणि सामाजिक कार्यकर्ते जास्त होते, जीवाभावाचा कार्यकर्ता हरपला.
- शरद पवार
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन धक्कादायक व दुःखद आहे. बीड जिल्ह्यातून राजकीय पार्श्वभूमी नसताना मेटे यांनी विविध आंदोलनातून आपले नेतृत्व सिद्ध केले. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी नेहमीच आग्रही असणारे एक तडफदार नेतृत्व महाराष्ट्राने गमावले.
- दिलीप वळसे पाटील
मराठा समाजासाठी झटणारा नेता हरवला. माझे वैयक्तीक नुकसान.
- धनंजय मुंडे.