Vinayak Mete Accident: मंत्रालयातून दोन फोन, कार्यकर्त्यांना विचारले मुंबईला जाऊ की नको, अन्...; विनायक मेटे वाचले असते, कार्यकर्ते भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 01:44 PM2022-08-14T13:44:03+5:302022-08-14T13:44:30+5:30
Vinayak Mete Accident: विनायक मेटे यांचे पार्थिव जेजे रुग्णालयात आणण्यात आले आहे. दुपारी 2 च्या सुमारास त्यांचे पार्थिव त्यांच्या वडाळा भक्ति पार्क येथील निवासस्थानी आणण्यात येईल. त्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी त्यांच्या मृतदेह बीडला नेण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज अपघातात निधन झाले आहे. विनायक मेटे होते, म्हणून आम्ही होतो, ते नाहीत आम्ही शून्य झालो, अशी प्रतिक्रिया विनायक मेटेंच्या मोठ्या वहिणींनी दिली. शनिवारीच ते बीडमधील मोठ्या भावाच्या घरी होते. रविवारी बीडमध्ये शिवस्वराज्यची तिरंगा रॅली होती. त्याच दिवशी ते आईला भेटून आले होते, असे त्या म्हणाल्या.
मेटे यांच्या घरी नातेवाईकांची येजा वाढू लागली आहे. कार्यकर्ते देखील जमू लागले आहेत. मेटे यांच्यासोबत असलेला पोलीस अंगरक्षक देखील बीडचाच आहे. ते देखील गंभीर जखमी आहेत. मृत्यूशी झुंजत आहेत. असे असताना मेटे यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मेटे मुंबईला गेले नसते तर वाचले असते अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काल मेटे आमच्यासोबतच होते. मुख्यमंत्री कार्यालय आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून विनायक मेटेंना दोन फोन आले. तुम्हाला तातडीने मुंबईत मराठा आरक्षणाच्या बैठकीला यायचे आहे, असा निरोप होता. रविवारी बीडमध्ये तिरंगा यात्रेचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामुळे मेटे बीडमध्येच असणार होते. परंतू, मराठा आरक्षणाची बैठक असल्याने त्यांना जावे लागले. मेटेंनी मुंबईला जाऊ की नको, असे आम्हाला विचारले होते. परंतू आम्हीच त्यांना तिरंगा रॅली यशस्वी पार पाडू, असे आश्वासन दिले आणि मुंबईला जाण्यास सांगितले यामुळे ते निघाले, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
विनायक मेटेंच्या मातोश्री लोचनाबाई मेटे या राजेगावयेथून बीडला यायला निघाल्या आहेत. केज तालुक्यातील राजेगाववर शोककळा पसरली आहे.
विनायक मेटे यांचे पार्थिव जेजे रुग्णालयात आणण्यात आले आहे. दुपारी 2 च्या सुमारास त्यांचे पार्थिव त्यांच्या वडाळा भक्ति पार्क येथील निवासस्थानी आणण्यात येईल. त्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी त्यांच्या मृतदेह बीडला नेण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
शिवसंग्राम भवनपासून निघणार अंत्ययात्रा
विनायक मेटे यांचे पार्थिव मुंबईहून शिवसंग्रामला १४ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता आणण्यात येईल. त्यानंतर बीडमध्ये शिवसंग्राम भवन येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सकाळी साडेदहा वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली.